Flop Players In Under-19 World Cup: आयसीसी दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यापैकीच एक स्पर्धा म्हणजे, आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धा. आयसीसीकडून दर २ वर्षांनी आयोजित केलेली ही स्पर्धा खूप खास असते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पाऊल टाकण्याआधी खेळाडूंना आपल्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे. मोहम्मद कैफ, युवराज सिंग आणि विराट कोहली ही अशी नावं आहेत, ज्यांनी आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धा गाजवली आणि पुढे जाऊन दिग्गज खेळाडू बनले. मात्र, या स्पर्धेच्या इतिहासात असेही काही खेळाडू होऊन गेले, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क केले, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात ते पूर्णपणे फ्लॉप ठरले. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.
आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप गाजवून फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंचा विषय येतो तेव्हा उन्मुक्त चंद हे सर्वात पुढे असतं. भारतीय संघाने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळताना २०१२ अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. चौकार षटकारांसह धावांचा पाऊस आणि एकाच हंगामात अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले. पण वेळ जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळण्याची आली तेव्हा उन्मुक्त चंद पूर्णपणे फ्लॉप ठरला.
उन्मुक्त चंदची फलंदाजी पाहून सर्वांना हेच वाटलं होतं की, देशाला दुसरा विराट कोहली मिळाला आहे. पण, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. आयपीएल स्पर्धेत दिल्लीकडून ब्रेट ली विरोधात खेळताना त्रिफळाचित होणं हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. भारतीय क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्याने पुढे त्याने भारत सोडून अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
ही स्पर्धा गाजवल्यानंतर पुढे जाऊन फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंच्या यादीतील दुसरं नाव म्हणजे, पृथ्वी शॉ. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०२० मध्ये जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. त्यावेळी पृथ्वी शॉ भारतीय संघाचा कर्णधार होता. शुबमन गिलसोबत डावाची सुरुवात करताना पृथ्वी शॉ ने देखील भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. पुढे त्याला दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळाली. कमी वयात मोठे फटके खेळण्याची क्षमता पाहता, त्याला पुढे भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याला पुढील सचिन आणि ब्रायन लारा म्हटलं जात होतं. पण त्यानंतर तो फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याला शेवटचा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. पण एकदा बाहेर खाल्यानंतर तो संघात पुनरागमन करू शकला नाही.
