पाटण्याचा विजयरथ पुणे रोखणार?
पाटणा पायरेटसचा विजयरथ पुणेरी पलटण रोखणार काय, हीच उत्सुकता या दोन संघांमध्ये शुक्रवारी येथे होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या उपांत्य फेरीबाबत निर्माण झाली आहे. अन्य लढतीत गतविजेत्या यू मुंबा संघाला बंगाल वॉरियर्सविरुद्ध विजय मिळविताना फारशी अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमसारख्या मोठय़ा संकुलात प्रो कबड्डीचे सामने प्रथमच होत असल्यामुळे त्याबाबतही उत्कंठा वाढली आहे. पुणे व बंगाल या दोन्ही संघांनी प्रथमच उपांत्य फेरीत स्थान मिळवीत अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा पेपर सोपा नाही. अर्थात या दोन्ही संघांनी खूप मेहनत करीत या फेरीपर्यंत कौतुकास्पद वाटचाल केली आहे. हे लक्षात घेता उपांत्य फेरीबाबत त्यांच्याकडून झुंजार खेळाची अपेक्षा केली जात आहे. कबड्डीत कोणत्याही क्षणी सामन्यास कलाटणी मिळू शकते, हे चित्र या स्पर्धेत सातत्याने पाहायला मिळाले आहे.
साखळी गटात अव्वल स्थान घेत गतविजेत्या मुंबा संघाने यंदाच्या विजेतेपदासाठी आपणच मुख्य दावेदार असल्याची झलक दिली आहे. कर्णधार अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील मुंबा संघात सुरेंद्र नाडा, रिशांक देवडिगा व मोहित चिल्लर असे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत.

बंगाल नव्हे, ‘मराठी वॉरियर्स’
बंगाल वॉरियर्सने अनपेक्षित कामगिरी करीत बाद फेरीत स्थान मिळविले आहे. बंगाल संघाचा कर्णधार नीलेश शिंदे याच्यासह संघात बऱ्याचशा मराठी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे या संघास ‘मराठी वॉरियर्स’ म्हटले जात आहे. त्यांची मदार प्रामुख्याने नीलेश, नितीन मोरे, महेंद्र रजपूत, बाजीराव होडगे तसेच कोरियन खेळाडू जांग कुन ली यांच्यावर आहे.

आजचे सामने
* पुणेरी पलटण वि. पाटणा पायरेट्स ’ यू मुंबा वि. बंगाल वॉरियर्स.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ४ व एचडी २, ४. ’ वेळ : रात्री ८ वा.