संदीप कदम

बंगळूरु : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान असेल. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना तीन सामने पाहण्याची संधी मिळेल. हे सामने बंगळूरु येथील कांटीरवा इनडोअर स्टेडियममध्ये रंगणार आहे. यंदा बंगळूरु, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी प्रो कबड्डी लीगचे सामने होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीनंतर स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश मिळणार असल्याने या हंगामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

यंदाच्या हंगामासाठी उत्साह व्यक्त करताना दबंग दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार म्हणाला, ‘‘आम्ही गतविजेते आहोत आणि यंदाही चांगल्या कामगिरीचा आम्हाला विश्वास आहे.’’ तसेच यू मुम्बाचा कर्णधार सुरिंदर सिंगनेही दर्जेदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. ‘‘आमच्यासाठी जेतेपद मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असून आमची दुसरी फळीही भक्कम आहे. आम्ही एकावेळी एका सामन्याचा विचार करीत आहोत. चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा असून त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे सुरिंदरने सांगितले.

सामने

  • दबंग दिल्ली वि. यू मुम्बा

    वेळ : सायं. ७.३० वा.

  • बंगळूरु बुल्स वि. तेलुगू टायटन्स

    वेळ : रात्री ८.३० वा.

  • जयपूर पिंक पँथर्स वि. यूपी योद्धाज

    वेळ : रात्री ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी

चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील!

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीत पदक जिंकण्याची सर्वाधिक संधी असते. करोना प्रादुर्भावाचा सर्वच खेळांचा फटका बसला, पण या काळात आम्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर भर दिला. यासह लीगच्या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळाला,’’ असे प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी सांगितले. ‘‘यंदा तिन्ही स्टेडियममध्ये चाहत्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चाहत्यांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचा खेळ करणे हा एकच मार्ग आहे,’’ असेही ते म्हणाले.