प्रो कबड्डी लीगचे ५६ साखळी सामने झाले आहेत, आता फक्त चार सामन्यांनंतर दुसऱ्या हंगामाचा विजेता निश्चित होणार आहे. त्यामुळे तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्स यांच्यातील उपांत्य फेरीचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सचे आव्हान संपुष्टात आणून बाद फेरीत पोहोचलेल्या पाटणा पायरेट्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर घरच्या मैदानावर गतउपविजेत्या यु मुंबाने यंदा विजेतेपदावर मोहर उमटवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मनजीत चिल्लरच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्सचा संघ फॉर्मात आहे. याचप्रमाणे समतोल संघ म्हणून नावलौकिक असलेला मिराज शेखचा तेलुगू टायटन्स संघसुद्धा आव्हानासाठी सज्ज झाला आहे.
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर शुक्रवारी पहिली उपांत्य लढत तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. याबाबत बंगळुरूचा कप्तान मनजीत म्हणाला, ‘‘उपांत्य लढतीत एखादी चूक महागात पडू शकेल. अजय ठाकूरवर आमची प्रमुख मदार असेल.’’ तसेच तेलुगू टायटन्सचा कर्णधार मिराज शेखने उपांत्य लढतीसाठी खास रणनीती आखली असल्याचे सांगितले. ‘‘बंगळुरूविरुद्धच्या लढतीसाठी आम्ही बचावफळीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांच्याकडे मनजीत, अजयसारखे गुणी खेळाडू आहेत.’’
यंदाच्या साखळीत १४ पैकी १२ विजय संपादन करून गुणतालिकेतील अव्वल स्थानासह अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली यू मुंबाने आपले स्थान अधोरेखित केले आहे. त्यामुळेच राकेश कुमारच्या अनुपस्थितीत संदीप नरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाटणा पायरेट्सच्या तुलनेत यू मुंबाचे पारडे जड मानले जात आहे. या लढतीविषयी अनुप कुमार म्हणाला, ‘‘राकेशसारख्या अनुभवी खेळाडूची अनुपस्थिती पाटण्याला नक्की जाणवेल. शब्बीर बापू उपांत्य लढतीसाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त भूपिंदर आणि रिशांक देवाडिगा यांच्या चढायांवर आमची जबाबदारी असेल.’’ याचप्रमाणे पाटण्याचा कर्णधार संदीप नरवाल म्हणाला, ‘‘जयपूरला अतिआत्मविश्वास नडला, परंतु मुंबईविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल.’’

आजचे सामने
तेलुगू टायटन्स वि. बंगळुरू बुल्स
यू मुंबा वि. पाटणा पायरेट्स
वेळ : रात्री ८ वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२, ३ आणि स्टार स्पोर्ट्स एचडी-२, ३

दुसऱ्या हंगामासाठी विजेत्यांना दोन कोटी रुपयांची एकंदर बक्षिसे दिली जाणार आहेत.
विजेता : एक कोटी
उपविजेता : ५० लाख
तिसरे स्थान : ३० लाख
चौथे स्थान : २० लाख