मुंबई : भारताच्या कुमारी फुटबॉल संघाला (१७ वर्षांखालील) शुक्रवारी तिरंगी फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. स्वीडनने भारताला ३-० अशी धूळ चारली.

अंधेरी येथील मुंबई फुटबॉल एरिनावर झालेल्या या सामन्यात मालटिदा विनबर्ग (चौथे मिनिट), इदा वेन्डनबर्ग (२५ मि.) आणि मोनिका जुसू (९०+१ मि.) यांनी स्वीडनसाठी प्रत्येकी एक गोल केला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्वीडनने भारतावर वर्चस्व गाजवले. विनबर्गने गोलजाळ्याच्या डाव्या दिशेने पहिल्या पाच मिनिटांतच गोल नोंदवून स्वीडनला आघाडी मिळवून दिली. ११व्या मिनिटाला भारताच्या लिंडा कोमला गोल करण्याची संधी होती. परंतु तिने झळकावलेला चेंडू गोलजाळ्याच्या वरून गेला.

२१व्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र या वेळीही लिंडाने कॉर्नरवरून लगावलेला फटका थेट स्वीडनची गोलरक्षक मारिया स्वॉनने थोपवला. २५व्या मिनिटाला वेन्डनबर्गने स्वीडनसाठी दुसरा गोल करून भारतावरील दडपण वाढवले.

मध्यंतरानंतर भारताने कडवा प्रतिकार करून स्वीडनला एकही गोल करण्याची संधी मिळू दिली नाही. मात्र ८९व्या मिनिटाला भारताच्या सुमती कुमतीने स्वीडनच्या बचावपटूला पेनल्टी क्षेत्रात पाडल्यामुळे स्वीडनला पेनल्टी बहाल करण्यात आली व मोनिकाने या संधीचा पुरेपूर लाभ उठवताना संघासाठी तिसरा गोल नोंदवून भारताचा पराभव पक्का केला. मंगळवारी भारताचा थायलंडविरुद्ध सामना रंगणार आहे.