U19 Asia Cup 2025 Match Timing live streaming: नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी २०२५ च्या अखेरीस एक मोठी स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह ८ संघ सहभागी होणार आहेत. युएईमध्ये अंडर-१९ आशिया चषक २०२५ खेळवला जाणार आहे. आयसीसी पुरूष अंडर-१९ विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण असणार आहे. पण ही स्पर्धा कधी सुरू होणार आणि किती वाजता सामने असणार, जाणून घेऊया.

भारताच अंडर-१९ संघ आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची पूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. आयुष म्हात्रेसह १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आपल्या अफलातून फटकेबाजीची झलक दाखवताा दिसणार आहे. भारतीय संघ यजमान युएई संघाविरूद्ध सामन्याने मोहिमेला सुरूवात करणार आहे.

अंडर-१९ आशिया चषक २०२५ ही स्पर्धा १२ डिसेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २१ डिसेंबरला होणार आहे. दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. या संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. भारताचा अ गटात युएई, पाकिस्तान आणि मलेशियासह समावेश आहे, तर ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ टॉप फोरमध्ये जातील आणि नंतर सेमीफायनलमध्ये जिंकणारं संघ अंतिम सामन्यात भिडतील.

भारत १२ डिसेंबरपासून लीग टप्प्यातील सामन्यांना सुरूवात करेल. भारताचा पहिलाच सामना यूएई अंडर-१९ संघाविरुद्ध असेल, त्यानंतर, भारत कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरुद्ध दुसरा लीग सामना खेळेल. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना १४ डिसेंबर रविवारी खेळवला जाईल. यानंतर भारत लीग टप्प्यातील अखेरचा सामना मलेशियाविरूद्ध खेळणार आहे. भारतीय संघाचे अंडर-१९ आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता होतील.

अंडर-१९ आशिया चषक २०२५ मधील भारताचं वेळापत्रक

भारत अंडर-१९ विरुद्ध युएई १अंडर-१९ – १२ डिसेंबर, दुबई
भारत अंडर-१९ विरुद्ध पाकिस्तान अंडर-१९ – १४ डिसेंबर, दुबई
भारत अंडर-१९ विरुद्ध मलेशिया अंडर-१९ – १६ डिसेंबर, दुबई

अंडर-१९ आशिया चषक स्पर्धा लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि युएई यांच्यातील अंडर-१९ आशिया चषक २०२५ सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. चाहते सोनी स्पोर्ट्स टेन १ एसडी आणि एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन ३वर पाहू शकतात. तर ही स्पर्धा मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह पाहता येणार आहे.

भारत अंडर-१९ संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा ​​(उप-कर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन पटेल, नमन पुष्पक, डी दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह, उधव मोहन, आरोन जॉर्ज