U19 World Cup 2026 Match Timing: यंदा ३ मोठ्या आयसीसी स्पर्धा होणार आहेत. यातील पहिली स्पर्धा १५ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ ला उद्या म्हणजेच १५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. १६वा आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप झिम्बाब्वे व नामिबियाच्या यजमानपदाखाली होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यासाठी जगातील सर्व संघांना प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेतून मिळतात. यासह हा ५० षटकांचा वर्ल्डकप स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलियाने २०२४ मध्ये भारताला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. दुसरीकडे, भारताने सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. तर पाकिस्तानने दोनदा हे विजेतेपद जिंकलं आहे, तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एकदा या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. यावेळी, १६ संघ पुन्हा एकदा जेतेपदासाठी भिडतील आणि तरुण खेळाडूंमध्ये अटीतटीची स्पर्धा रंगणार आहे.

अंडर-१९ विश्वचषक २०२६ मधील गटनिहाय विभागणी

अ गट – ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान, श्रीलंका
ब गट – बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, अमेरिका
क गट – इंग्लंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, झिम्बाब्वे
ड गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, वेस्ट इंडिज

झिम्बाब्वे-नामिबियामध्ये कोणकोणत्या ठिकाणी होणार सामने?

या आयसीसी स्पर्धेसाठी पाच ठिकाणं निवडण्यात आली आहेत. झिम्बाब्वेमध्ये २५ सामने आणि नामिबियामध्ये १६ सामने खेळवले जातील. नामिबियाच्या ठिकाणांमध्ये नामिबिया क्रिकेट ग्राउंड आणि विंडहोकमधील हाय परफॉर्मन्स ओव्हल यांचा समावेश आहे. झिम्बाब्वेचा हरारे स्पोर्ट्स क्लब आणि ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब येथे सामने होतील आणि बुलावायोमधील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सामने होणार आहेत. अंतिम सामना देखील ६ फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाईल.

गट टप्प्यात एकूण २४ सामने खेळवले जातील. सर्व सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी १:०० वाजता सुरू होतील. या स्पर्धेचा पहिलाच सामना भारत अंडर-१९ आणि अमेरिका अंडर-१९ संघांमध्ये १५ जानेवारीला बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल.

भारतीय संघाचं अंडर-१९ विश्वचषक २०२६ चं वेळापत्रक

१५ जानेवारी – भारत वि. अमेरिका – बुलावायो
१७ जानेवारी – भारत वि. बांगलादेश – बुलावायो
२४ जानेवारी – भारत वि. न्यूझीलंड – बुलावायो

अंडर-१९ वर्ल्डकपसाठी भारतीय संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार) वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडु (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर.एस. अंबरीश, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग,उधव मोहन, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद ऐनाम.