नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगीर महासंघाला (डब्ल्यूएफआय) आजपासून लास वेगास येथे सुरू होत असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पूर्ण क्षमतेचा संघ पाठविण्यापासून वंचित रहावे लागले आहे. या स्पर्धेसाठी केवळ फ्री-स्टाईल प्रकारातील दहाही मल्लांना व्हिसा मंजूर झाला आहे. ग्रीको-रोमन आणि महिलांच्या प्रकारात केवळ प्रत्येकी पाचच मल्लांना व्हिसा मंजूर झाला आहे.
ग्रीको-रोमन स्पर्धा आज, सोमवारी सुरू होत असल्यामुळे व्हिसा मंजूर न झालेल्या मल्लांना आता मायदेशीच रहावे लागणार आहे. व्हिसा मंजूर झालेले पाचही खेळाडू अमेरिकेला रवाना झाले असून, आता महिला मल्लांचे व्हिसा मिळण्यात अडचणी येणार नाहीत, याबाबत ‘डब्ल्यूएफआय’ आशावादी आहे.
महिलांचे सामने बुधवारी सुरू होत आहे. महासंघ हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून सकारात्मक निकालाबाबत आशावादी आहे. ‘‘महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत दूतावास आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करेल. त्यांनी या स्पर्धेसाठी मोठी तयारी केली आहे आणि त्यांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत,’’ असे ‘डब्ल्यूएफआय’चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
अमेरिकेने एकूण नऊ भारतीय मल्लांना व्हिसा नाकारला असून, यात ग्रीको-रोमन प्रकारातील पाच आणि महिलांच्या चार मल्लांचा समावेश आहे. ग्रीको-रोमन मल्लांना आता व्हिसा मंजूर होऊनही फायदा नाही. ते वेळेत पोहचू शकणार नाहीत. महिलांना मात्र आणखी एक दिवसच प्रतीक्षा करता येईल. त्यांनाही व्हिसा फेटाळण्यात आला, तर महिला विभागात भारताचा सहाच वजनी गटात सहभाग असेल. परवीन (५० किलो), अहिल्या शिंदे (५५ किलो), नेहरा शर्मा (५७ किलो), नेहा सांगवान (६५ किलो) या महिला कुस्तीपटू या स्पर्धेस जाऊ शकणार नाहीत. व्हिसा अडचणींमुळे पुरुष गटातून समर्थ गजानन म्हाकवे, धीरज कुमार मलिक, सचिन कुमार, निखिल, हरदीप या पाच मल्लांना मायदेशातच थांबावे लागणार आहे.
