बुडापेस्ट (हंगेरी) : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला अवघे बारा दिवस शिल्लक असताना आज, शनिवारी होणार्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे फुटबॉल प्रेमींच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या वेळी गतविजेत्या पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघासमोर वीस वर्षांनी प्रथमच अंतिम फेरी गाठणार्या आर्सेनल संघाचे आव्हान असणार आहे.
यंदाच्या अंतिम लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी या दोन संघांत उपांत्य फेरीची लढत झाली होती. तेव्हा सेंट-जर्मेनने विजय मिळविला होता. आता त्या पराभवाची परतफेड करुन थेट विजेतेपद मिळविण्याची आर्सेनलला संधी आहे. आर्सेनल संघ यंदा चांगल्याच लयीत आहे. त्यांनी यावर्षी प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. हेच सातत्य कायम राखण्याच्या दडपणाचे आव्हान त्यांच्यावर राहणार आहे.
सेंट-जर्मेन संघाने यंदा या स्पर्धेत कमालीचे सातत्य राखले आहे. या हंगामाच्या सुरुवातीला ॲटलांटा, लेव्हरकुसेन, बार्सिलोना आणि टॉटेनहॅम यांच्याविरुद्ध धमाकेदार विजय मिळवल्यानंतर, सेंट-जर्मेनने बाद फेरीत आणखी वेग पकडला आणि बायर्न म्युनिकविरुद्ध एका रोमांचक उपांत्य फेरीपूर्वी चेल्सी आणि लिव्हरपूलला सहज हरवले.
दुसरीकडे, आर्टेटाच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनलची प्रगती जरी टप्प्याटप्प्याने झाली असली, तरी ती अत्यंत लक्षणीय ठरली आहे. आर्सेनलने २०२३-२४ मध्ये उपांत्यपूर्व फेरी, २०२४-२५ मध्ये उपांत्य फेरी आणि आता २००५-०६ नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली.
आर्सेनलसाठी, या स्पर्धेतील विजय हा त्यांच्या एका ऐतिहासिक मोहिमेचा शानदार समारोप ठरेल आणि प्रथमच हा करंडक उत्तर लंडनमध्ये घेऊन येईल. तर सेंट-जर्मेनसाठी हा विजय त्यांना युरोपियन स्पर्धेतील दुसरे विजेतेपद मिळवून देईल. सलग दोन विजेतेपदे पटकावणारा पहिला फ्रेंच क्लब म्हणून त्यांची ओळख निर्माण करेल आणि क्लबमधील लुईस एनरिकेचा वारसा अधिकच भक्कम करेल.
सर्वोत्तम बचाव विरुद्ध आक्रमण असा हा अंतिम सामना रंगणार आहे. आर्सेनलने यंदा या स्पर्धेत केवळ सहा गोल स्वीकारले आहेत, तर सेंट -जर्मेनने ४४ गोल केले आहेत. बुकायो साका, मार्टिन ओडेगार्ड, डेक्लान राइस आर्सेनलची, तर ओस्मान डेम्बेले, खविचा क्वारात्सखेलिया, अश्रफ हकिमी सेंट जर्मेनची ताकद राहणार आहे.
- वेळ : रात्री ९.३० वा.
- थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, ३
