पीटीआय, कॅम्पाला भारताच्या सुकांत कदमने युगांडा आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडिमटन स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक पटकावले, तर प्रमोद भगतने तीन रौप्य पदकांची कमाई केली.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या कदमने भारताच्या नीलेश गायकवाडचा ३८ मिनिटांत २१-१६, १७-२१, २१-१० असा पराभव केला. क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या भगतला मात्र अंतिम सामन्यांत झगडावे लागले. पुरुष एकेरीत भगतला सहकारी मनोज सरकारकडून १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मग पुरुष दुहेरीत भगत आणि सरकार जोडीने मोहम्मद अन्सारी आणि दीप बिसोयी जोडीकडून २१-१०, २०-२२, १५-२१ अशी हार पत्करली. त्यानंतर मिश्र दुहेरीत भगत आणि पलक जोशी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऋतिक रघुपती आणि मानसी जोशी जोडीने त्यांना २१-१९, २१-१६ असे नामोहरम केले.