भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना इंग्लंडला जाण्याची परवानगी!

दोन ते तीन महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू बुधवार, २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबातील सदस्यांनाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी दिली. मात्र इंग्लंडमधील विलगीकरणाच्या कठोर निर्बंधांमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी बीसीसीआयचा एकही पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून त्यानंतर ऑगस्टमध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या प्रदीर्घ दोन ते तीन महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू बुधवार, २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. या काळात जैव-सुरक्षित वातावरणात राहताना कुटुंबीयांसह वेळ घालवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी खेळाडूंनी केली होती.

‘‘जैव-सुरक्षित वातावरणात राहणे किती आव्हानात्मक असते, हे खेळाडूच जाणतात. अशा वेळी कुटुंबातील सदस्य सोबतीला असणे मानसिकदृष्टय़ा गरजेचे असते. त्यामुळे भारतीय पुरुष तसेच महिला संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांसह इंग्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uk accepts bcci request to allow family members of india cricketers during the england tour zws