scorecardresearch

रशियाला लढा देण्यासाठी बुद्धिबळपटूंचा पुढाकार

बुद्धिबळाचा प्रत्येक डाव हा युद्धासारखाच असतो, असे अमेरिकेचे दिवंगत बुद्धिबळपटू बॉबी फिशर म्हणायचे.

किव्ह : युरोपातील महासत्ता रशिया आणि त्यांचे शेजारील राष्ट्र युक्रेन यांच्यातील संघर्ष जवळपास दोन आठवडय़ांनंतरही सुरूच आहे. दोन्ही देशांनी माघार घेण्याची तयारी दर्शवलेली नाही. रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मोठय़ा जीवितहानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या देशासाठी युक्रेनच्या सामान्य जनतेनेही शस्त्रे हातात घेतली असून त्यांच्या बुद्धिबळपटूंनीही रशियन सैन्याला लढा देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सध्या चित्र आहे.

बुद्धिबळाचा प्रत्येक डाव हा युद्धासारखाच असतो, असे अमेरिकेचे दिवंगत बुद्धिबळपटू बॉबी फिशर म्हणायचे. मात्र आता बुद्धिबळाच्या पटावर नाही, तर खऱ्या आयुष्यात युद्ध लढण्याची युक्रेनच्या बुद्धिबळपटूंवर वेळ आली आहे. ग्रँडमास्टर आणि युक्रेनच्या राष्ट्रीय बुद्धिबळ संघाचा कर्णधार ओलेक्झांडर सुल्यपाने हातात रायफल धरून लिव्ह शहरात रशियन सैन्याला लढा देण्यासाठी तयार असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. ‘शत्रूंपासून मी माझ्या देशाचे रक्षण करत आहे. सत्याचा विजय होईल याची मला खात्री आहे,’ असे त्या छायाचित्राखाली ओलेक्झांडरने लिहिले.

तसेच ५६ वर्षीय ग्रँडमास्टर जॉर्जी टिमोशेन्कोही युद्धात सहभागी झाला. ‘युरा (टिमोशेन्को) रायफल घेऊन राजधानीचे (किव्ह) रक्षण करण्यासाठी सज्ज आहे,’ असे त्याची मैत्रीण ज्युलियाने समाजमाध्यमांवर लिहिले. टिमोशेन्कोने काही वर्षांपूर्वी ओडिशा, गुजरात आणि भारताच्या अन्य काही शहरांत बुद्धिबळ शिबिरे घेतली होती. त्यामुळे युवा भारतीय बुद्धिबळपटूंच्या यशात टिमोशेन्कोचेही योगदान आहे.

माजी युरोपीय विजेती नतालिया झुकोव्हा ही ओदेसा शहरातील नागरिकांना साहाय्य करत आहे. त्याचप्रमाणे पावेल एलयानोव्ह आणि इगोर कोव्हालेन्को हे युक्रेनियन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू पुढे येऊन लोकांची मदत करत आहेत.

युक्रेनच्या डायानाला उपविजेतेपद

लियॉन : युक्रेनची टेनिसपटू डायाना यास्त्रेमस्काने लियॉन येथे झालेल्या डब्ल्यूटीए स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. युक्रेनमधील ओदेसा शहरातून सुखरूप बाहेर पडून तिला या स्पर्धेत सहभाग घेण्यात यश आले. अंतिम सामन्यात डायानाला चीनच्या झांग शुईने  ६-३, ३-६, ४-६ असे पराभूत केले. या स्पर्धेतून मिळालेली रक्कम ती युक्रेनच्या नागरिकांना दान करणार आहे.

जोकोव्हिचकडून मदतीचा हात

लंडन : सर्बियाचा २० ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने युक्रेनचा माजी टेनिसपटू सर्गे स्टाखोव्हस्कीला आर्थिक आणि अन्य कोणत्याही प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.  रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सर्गे त्याच्या देशाच्या राखीव सैन्यदलात दाखल झाला. सर्गेने २०१३च्या विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का दिला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine chess players initiative to fight against russia zws

ताज्या बातम्या