Umesh Yadav Ranji Trophy 5 Wickets vs Assam: ३८ वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने जवळपास दोन वर्षांनंतर रणजी करंडक स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. आसामविरुद्ध पंजाबचं प्रतिनिधित्व करताना त्याने एका डावात पाच बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. चंदीगडमध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे पंजाबने आसाम संघाला ३७३ धावांवर रोखलं. मुख्य म्हणजे उमेश यादवने विदर्भाची साथ सोडल्यानंतर तो आता पंजाब संघाकडून खेळत आहे.

डिसेंबर २०२४ नंतरचा आपला पहिला रणजी सामना खेळताना, उमेश यादवने दोन दिवसांत २४ षटकं गोलंदाजी केली आणि ७० धावांत ५ बळी टिपले. आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी त्याने सोळाव्यांदा केली आहे.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी करत उमेशने सलामीवीर ऋषभ दासला शून्यावर बाद केलं आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या राजवीर सिंगला तंबूत परत पाठवलं. त्यानंतर सोमवारी त्याने आसामच्या खालच्या फळीतील फलंदाज अमलॉन ज्योती दास, मुख्तार हुसेन आणि मोहित ठाकूर यांना बाद केलं, ज्यामुळे पंजाब संघाला आसामचा डाव ४०० धावांच्या आत गुंडाळण्यात यश आलं.

उमेश यादवने या सामन्यात २४ षटकं गोलंदाजी करत ७० धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. त्याच वेळी, पंजाबचा २६ वर्षीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने २३ षटकं गोलंदाजी केली. आसामच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली असली, तरी या दोन गोलंदाजांनी एकत्रितपणे धावांचा वेग रोखला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. कर्णधार दानिश दास आणि शिबशंकर रॉय यांनी आपापल्या शानदार शतकांच्या जोडीने आसामचा डाव पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दानिशने १८६ चेंडूंत १०३ धावा केल्या, तर शिबशंकर रॉय १४३ धावांवर नाबाद राहिला.

उमेश यादवने आतापर्यंत १२४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २२६ डावांमध्ये २९.७१ च्या सरासरीने ३८० बळी घेतले आहेत. एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ४८ धावांत ७ बळी घेणं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १५ वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी केली आहे. विदर्भ संघ सोडल्यानंतर उमेश यादव एखाद्या लहान संघात सामील होईल अशी चर्चा होती; मात्र, त्याने स्पष्ट केलं की कमकुवत संघाकडे जाण्याऐवजी त्याला एका मजबूत आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाकडून खेळायचे होते. म्हणूनच त्याने पंजाबच्या बलाढ्य संघात सामील होण्याचा निर्णय घेतला.