सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यजमान श्रीलंका सध्या जबरदस्त कामगिरी करत असून त्यांनी पाहुण्यांना तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले. या विजयासह लंकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा तिसरा एकदिवसीय सामना सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान पंच असलेले कुमार धर्मसेना अचानक ‘क्रिकेटर मोड’मध्ये गेल्याचे दिसले. धर्मसेनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुमार धर्मसेना पंच म्हणून मैदानात उभे होते. ऑस्ट्रेलियाच्या डावात यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी फलंदाजी करत असताना त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक फटका मारला. नेमक्या त्याच बाजूला पंच कुमार धर्मसेना उभे होते. कधीकाळी क्रिकेटर असलेले धर्मसेना आपण पंच असल्याचे विसरून गेले आणि त्यांनी चेंडू पकडण्यासाठी हात पुढे केले. पण, त्यानंतर काही सेकंदातच त्यांना आपण पंच असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी घाईघाईने हात मागे घेतले.

कुमार धर्मसेना यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी तर एकदिवसीय विश्वचषकाच्यावेळी तयार झालेले धर्मसेना यांचे मीम पुन्हा कमेंटबॉक्समध्ये शेअर केले आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पंच असलेले कुमार धर्मसेना ९०च्या दशकात श्रीलंकेचे क्रिकेटपटू होते. त्यांनी श्रीलंकेसाठी३१ कसोटी आणि १४१ एकदिवसीय सामनेही खेळलेले आहेत.