मलाहाइड : युवा उमरान मलिकमध्ये तेजतर्रार मारा करण्याची क्षमता असून त्याच्याविरुद्ध मोठे फटके मारणे सोपे नाही. त्यामुळे मी त्याला अखेरच्या षटकाची जबाबदारी दिली, असे विधान भारताचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यानंतर केले.

या सामन्यात दीपक हुडा (५७ चेंडूंत १०४ धावा) आणि संजू सॅमसन (४२ चेंडूंत ७७) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २२५ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात आर्यलडच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. मात्र, उमरानने टाकलेल्या या षटकात त्यांना १२ धावाच करता आल्या. 

‘‘मला अजिबात चिंता वाटत नव्हती. कर्णधार म्हणून मला कोणत्याही दडपणाविना निर्णय घ्यायचे होते. मी केवळ त्या षटकाचा विचार करत होतो. मी अखेरचे आणि निर्णायक षटक उमरानला देण्याचा निर्णय घेतला, कारण त्याच्यामध्ये तेजतर्रार मारा करण्याची क्षमता आहे. तो ज्या वेगाने गोलंदाजी करतो, त्याविरुद्ध फटकेबाजी करणे अवघड आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता,’’ असे हार्दिक म्हणाला.