बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने विजयी घौडदौड सुरू राखल्याने आंतराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताने अव्वल स्थान गाठले आहे.
‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार भारतीय संघ ट्वेन्टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. यापूर्वी श्रीलंका संघ अव्वल स्थानी होता.
यावेळीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांत सफाईदार विजय प्राप्त करत भारतीय संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. दुसऱया बाजूने श्रीलंकेनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या लढतीवर क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अव्वल स्थान कायम राखणे आणि गमावलेले स्थान परत मिळविण्याची संधी या दोन्ही संघांना आहे.  
आयसीसी ट्वेन्टी-२० फलंदाजांच्या क्रमावारित भारताचा युवा फलंदाज विराट कोहली तिसऱया स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच अव्वल स्थानी आहे. पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत कोहलीसह, युवराज आणि सुरेश रैनाचा समावेश आहे. तसेच पहिल्या दहा ट्वेन्टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विन या एका गोलंदाजाला स्थान मिळविता आले आहे. अश्विन गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी आहे.