यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. तेव्हापासून भारतीय चाहते बदला घेण्याची वाट पाहत आहेत. आता या पराभवाचा वचपा काढता येऊ शकतो. २३ डिसेंबरपासून अंडर-१९ आशिया कपला सुरुवात होत आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघही या स्पर्धेत उतरणार आहेत. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. २५ डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी दुबईत दोघांमध्ये रंजक टक्कर होणार आहे. स्पर्धेचे सामने यूएईमध्ये खेळवले जातील. यश धुल भारताचा कर्णधार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आयोजित केलेल्या स्पर्धेत ८ संघ सहभागी होत आहेत. ते दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांना स्थान मिळाले आहे. तर बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि कुवेत हे ब गटात आहेत. प्रत्येक संघाला तीन साखळी सामने खेळायचे आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत गेले, तर पुन्हा एकदा अंतिम फेरीत दोघांमध्ये टक्कर होऊ शकते.

अंडर-१९ आशिया चषक १९८९ मध्ये सुरू झाला. आतापर्यंत एकूण ८ हंगाम सामने खेळले गेले आहेत. भारताने ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. २०१२ मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळलेला अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. या कारणास्तव दोघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्याच वेळी, २०१३-१४ मध्ये झालेल्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तान संघाचा ४० धावांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये या स्पर्धेचा अंतिम हंगाम श्रीलंकेत खेळला गेला. त्यानंतर भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला.

पुढील महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये अंडर-१९ विश्वचषकही होणार असल्याने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. अशा स्थितीत संघाची तयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा – VIDEO : काहीतरी शिजतंय..! शास्त्री मास्तरांनी दिले संकेत; मिळणार मोठी जबाबदारी!

आशिया कपमध्ये भारताचे सामने खालीलप्रमाणे –

  • २३ डिसेंबर- भारत विरुद्ध यूएई
  • २५ डिसेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
  • २७ डिसेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
  • ३० डिसेंबर- सेमीफायनल
  • ३१ डिसेंबर- फायनल

भारतीय संघ

हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under 19 asia cup india vs pakistan clash on 25 december adn
First published on: 21-12-2021 at 08:20 IST