scorecardresearch

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाची विजयाची हॅट्ट्रिक; बावा, रघुवंशीच्या शतकांमुळे युगांडाचा ३२६ धावांनी धुव्वा

आक्रमक शैलीत फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर रघुवंशीला आधी हर्नूर सिंग (१५) आणि कर्णधार निशांत सिंधू (१५) यांची साथ लाभली.

बावा, रघुवंशीच्या शतकांमुळे युगांडाचा ३२६ धावांनी धुव्वा

राज बावा (१०८ चेंडूंत नाबाद १६२ धावा) आणि मुंबईकर अंक्रिश रघुवंशी (१२० चेंडूंत १४४ धावा) यांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अखेरच्या साखळी सामन्यात युगांडाचा ३२६ धावांनी धुव्वा उडवला. हा भारताचा युवा विश्वचषकातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला.

या सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. आक्रमक शैलीत फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर रघुवंशीला आधी हर्नूर सिंग (१५) आणि कर्णधार निशांत सिंधू (१५) यांची साथ लाभली. मग रघुवंशी आणि बावा यांनी उत्कृष्ट फलंदाजी करताना वैयक्तिक शतके साकारतानाच २०६ धावांची भागीदारी रचली. रघुवंशीच्या १४४ धावांच्या खेळीत २२ चौकार आणि चार षटकार, तर बावाच्या नाबाद १६२ धावांच्या खेळीत १४ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. त्यांच्या या फटकेबाजीमुळे भारताने ५० षटकांत ५ बाद ४०५ अशी धावसंख्या उभारली.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना युगांडाचा डाव १९.४ षटकांत ७९ धावांत संपुष्टात आणला. युगांडाचा कर्णधार पास्कल मुरूंगीने (३४) एकाकी झुंज दिली. भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. आता २९ जानेवारीला होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांच्यापुढे गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ५ बाद ४०५ (राज बावा नाबाद १६२, अंक्रिश रघुवंशी १४४; पास्कल मुरूंगी ३/७२) विजयी वि. युगांडा : १९.४ षटकांत सर्व बाद ७९ (पास्कल मुरूंगी ३४; निशांत सिंधू ४/१९, राजवर्धन हंगर्गेकर २/८)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Under 19 world cup cricket tournament indian team record victory akp

ताज्या बातम्या