शुभमन गिलचे शतक, सलामीवीर कर्णधार पृथ्वी शाॅ आणि मनज्योत कालरा यांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर व ईशान पोरेलसह भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने पाकचा तब्बल २०३ धावांनी दणदणीत पराभव केला. अंडर १९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाला उत्तर देताना पाकचा डाव अवघ्या ६९ धावांतच संपुष्टात आला. पाककडून अवघ्या तीन फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पाकच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचेच काम केले. पोरेलला शिवा सिंग, पराग या गोलंदाजांनी दोन-दोन गडी टिपून योग्य साथ दिली. अंतिम सामन्यात भारताची आता ऑस्ट्रेलियाबरोबर गाठ पडणार आहे.

तत्पूर्वी, भारताकडून शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची खेळी केली. शुभमने शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. यंदाच्या अंडर १९ विश्वचषकातील भारताकडून हे पहिलेच शतक होते. दरम्यान, पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलच्या गोलंदाजीवर पाक फलंदाजांची भंबेरी उडाल्याचे दिसले. पाकच्या फलंदाजांना त्याने स्वस्तात तंबूत धाडले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. कर्णधार पृथ्वी शॉने ४२ धावांची खेळी केली. तर मनज्योत कालरा ४७ धावा काढून बाद झाला. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या संपूर्ण मालिकेत भारताने एकही सामना गमावलेला नाही.

भारताकडून शुभमनने ९४ चेंडूवर सर्वाधिक १०२ धावा बनवल्या. दुसरीकडे पाकिस्तानकडून मोहम्मद मुसाने ६७ धावा देत सर्वाधिक ४ गडी टिपले. शुभमने या विश्वचषकातील सर्व सामन्यात ५० हून अधिक धावा केल्या आहेत.

अंडर १९ स्तरावर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात भारताने १२ तर पाकने ८ सामन्यात विजय नोंदवला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये अंडर १९ विश्वचषकावेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते. भारताने तो सामना ४० धावांनी जिंकला होता. भारताने यंदाच्या विश्वचषकात पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे आणि बांगलादेशचा पराभव केला तर अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारल्यानंतर पाकने आयर्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे.

 

Updates :

  • भारत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाबरोबर भिडणार
  • भारताकडून ईशान पोरेलने ४, शिवा सिंग- आर परागने २-२ आणि ए रॉय- अभिषेक शर्माने एक-एक गडी टिपला
  • भारताकडून पाकचा २०३ धावांनी दणदणीत पराभव
  • अभिषेक शर्माने अर्शद इक्बालचा बळी टिपून पाकचा डाव आटोपला.
  • पाकची शेवटची जोडी फलंदाजीसाठी मैदानात
  • पाक- २९ षटकांत ९ बाद ६९ धावा
  • भारताच्या देसाईचे चपळ यष्टीरक्षण, साद खानला केले यष्टीचीत
  • पाक- २८ षटकांत ८ बाद ६४ धावा
  • मोहम्मद मुसाचा शिवाच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार
  • पाक- २५ षटकांत ८ बाद ४८ धावा
  • शिवा सिंगने घेतला आठवा बळी, शाहीन शहा आफ्रिदीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला झेल
  • पाकिस्तान २० षटकांत ७ बाद ४५ धावा
  • लेगब्रेक गोलंदाज रियान परागची भेदक गोलंदाजी
  • पाक धावफलक: १८ षटकांत ५ बाद ३७ धावा
  • शिवा सिंगने घेतला पाकचा पाचवा बळी, मोहम्मद ताहा ४ धावांवर बाद
  • वेगवान गोलंदाज ईशान पोरेलची भेदक गोलंदाजी, पाकचे चार गडी तंबूत
  • पाकची अडखळत सुरूवात, दोन्ही सलामीवीर तंबूत
  • भारताने ५० षटकांत ९ बाद २७३ धावा केल्या. पाकसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान
  • भारताच्या शुभमन गिलची नाबाद १०२ धावांची खेळी. ७ चौकारांच्या मदतीने शेवटच्या चेंडूवर शतक पूर्ण