वुंग ताऊ (व्हिएतनाम) : भारतीय महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही युवा (२३ वर्षांखालील) आशियाई कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारात सांघिक विजेतेपदाचा मान मिळवला.

भारतीय कुस्तीगिरांची फ्री-स्टाईल प्रकारातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारतीय पुरुष खेळाडूंनी १० पैकी ७ वजनीगटांत पदकांची कमाई केली. यामध्ये सहा सुवर्ण आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. महिला संघाचे यश अधिक लक्षणीय ठरले. महिला कुस्तीगिरांनी सर्व दहा वजनी गटांतून पदकांची कमाई केली.

पुरुष गटातून निखिल (६१ किलो), सुजीत कलकल (६५ किलो), जयदीप (७४ किलो), चंद्रमोहन (७९ किलो), सचिन (९२ किलो), विकी (९७ किलो) यांनी सोनेरी यश मिळवले, तर जयपूरन सिंग १२५ किलो गटात रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने या स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात एका सुवर्णपदकासह तीन पदके जिंकली. या प्रकारातही भारताची कामगिरी सर्वोत्तम ठरली. ‘‘हे यश भारतीय कुस्तीसाठी नक्कीच आशादायी आणि प्रेरणादायी आहे. भारतीय मल्ल चांगली तयारी करत आहेत. त्यांचे हे यश भविष्यात असेच वरिष्ठ गटातही परावर्तीत होईल अशी आशा,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले. याच केंद्रावर आता १७ वर्षांखालील गटाच्या आशियाई स्पर्धेला सुरुवात झाली.