भारताविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सामोरे जाण्यापूर्वीच सराव परीक्षेत वेस्ट इंडिजचा संघ अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियमवर नऊ विकेट राखून सहज शरणागती पत्करल्यानंतर रविवारी वानखेडे स्टेडियमवर मात्र विंडीज संघाने थोडीफार झुंजार वृत्ती दाखवून अखेरच्या षटकापर्यंत रंगत टिकवून ठेवली. पण भारतीय ‘अ’ संघाने दुसऱ्या सराव सामन्यात १६ धावांनी विजयाचा करिष्मा दाखवला. दिल्लीचा फलंदाज उन्मुक्त चंदच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे सलग दुसऱ्या विजयाची नोंद भारताला करता आली.
भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना २८२ धावांचे आव्हान उभे केले ते चंदच्या शतकाच्या बळावर. पहिल्या सराव सामन्यात ७९ धावा काढणाऱ्या चंदने १११ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने १०१ धावा केल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी करुण नायर (६४) सोबत १४९ धावांची भागीदारी रचली.
विंडीजची प्रारंभी ४ बाद ६५ अशी खराब केविलवाणी अवस्था झाल्यानंतर त्यांच्या विजयाच्या अपेक्षा मावळल्या होत्या. परंतु यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश रामदिनने (१०२ धावा, १०२ चेंडू, १० चौकार, ३ षटकार) शतकी खेळी साकारून विंडीजच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. त्याने डॅरेन सॅमी (४९) आणि जेसॉन होल्डर (५४) यांच्यासोबत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. अखेरच्या षटकांत विंडीजला विजयासाठी २३ धावा हव्या होत्या, परंतु बुमराहने फक्त ६ धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : ४८.१ षटकांत सर्व बाद २८२ (उन्मुक्त चंद १०१, करुण नायर ६४; जेरॉम टेलर ३/५१, किरॉन पोलार्ड २/२९) विजयी वि. वेस्ट इंडिज : (दिनेश रामदिन १०२, डॅरेन सॅमी ४९, जेसॉन होल्डर ५४; धवल कुलकर्णी ३/३९, जसप्रित बुमराह २/४३, करण शर्मा २/७०).