देवेंद्र पांडे आणि मिहीर वसावदा

आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आलेला नाही अशी अर्धवट स्वरुपाची खेळपट्टी, अपूर्ण काम झालेलं ड्रेसिंगरुम आणि किटबॅग ठेवल्यावर वावरायला जागा नसलेल्या हॉटेलच्या खोल्या- एशियन गेम्समध्ये क्रिकेटचे सामने होणार असलेल्या ठिकाणाची ही अवस्था. तीन आठवड्यात जपानमधील प्रसिद्ध बंदर शहर नगोयाजवळच्या निशीन इथे क्रिकेटचे सामने होणार आहेत. आशियाई उपखंडातील संघ पर्यायाने स्टारडमप्राप्त भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी आहेत. १९ सप्टेंबर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. क्रिकेटचे सामने १७ सप्टेंबरपासूनच सुरू होतील.

आयत्यावेळी घाईघाईत तयार करण्यात आलेल्या या स्टेडियम तसंच निवासाच्या व्यवस्थेबाबत संघांनी नाराजी प्रकट केली आहे. जपानमधलं हे मैदान खरंतर बेसबॉल सामन्यांसाठी वापरलं जातं. एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आल्यानंतर या मैदानाचं रुपांतर क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात येत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानने स्टेडियम आणि एकूणच स्थितीबाबत मुद्दे मांडल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका तसंच अफगाणिस्तान देशांच्या प्रतिनिधींशी एकमेकांशी केलेल्या चर्चेनंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रतिनिधी या मैदानाची आणि खेळाडूंच्या निवास व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर ते अहवाल सादर करतील.

‘हे प्राथमिक स्वरुपाचं मैदान आहे. खेळपट्टीच्या दर्जाबाबत साशंकता आहे. अगदी अलीकडे खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. छोटेखानी स्पर्धा खेळवण्यात आली आहे. ड्रेसिंगरुमही अर्धवट स्थितीत आहेत’, असं सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत खेळपट्टीची स्थिती, ड्रेसिंगरुमची अवस्था यासंदर्भात चर्चेनंतर बीसीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि एशियन गेम्सच्या संयोजन समितीशी संपर्क केला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितलं की, ‘क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आम्हाला तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे एशियन गेम्सच्या संघटकांशी संपर्क साधा असं आम्ही बीसीसीआयला म्हटलं आहे. एशियन गेम्सच्या संयोजकांना यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही’.

एशियन गेम्स स्पर्धेत क्रिकेटचे सामने कोरोगी स्पोर्ट्स पार्क इथे होणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत इथे बेसबॉलचे सामने व्हायचे. या मैदानात २००० प्रेक्षक बसू शकतात. हायब्रिड पद्धतीच्या या खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत आहे. पॉलिथेलिन फायबरही खेळपट्टीत आहे.

मे महिन्यात या मैदानावर आयसीसीच्या टी२० वर्ल्डकप ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायरचा सामना खेळवण्यात आला. खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळेल असं कोरोगी स्पोर्ट्स पार्कचे एशियन गेम्स ऑपरेशन्स मॅनेजर अ‍ॅडम बिरस यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं.

मैदानापासून २० किमीवर असलेल्या नागोया इथे खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसाधारपणे एशियन गेम्ससाठी गेम्स व्हिलेज तयार करण्यात येतं. मात्र या स्पर्धेसाठी अशी व्यवस्था नसल्याने १५,००० स्पर्धक क्रूझ लायनर, व्हिला आणि हॉटेल्स अशा विविध ठिकाणी राहणार आहेत.

बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, क्रिकेट, फुटबॉल, सॉफ्टबॉल हे खेळाडू नागोया इथे वास्तव्याला आहेत असं ऑलिम्पिक काऊंसिल ऑफ एशियाने सांगितलं. हॉटेलमधल्या खोल्यांचा आकार खूपच लहान आहे. दोन खेळाडू एका खोलीत असतील आणि एकाने किटबॅग उघडली तर दुसऱ्याला वावरायला जागाच शिल्लक राहणार नाही असं एका प्रतिनिधीने सांगितलं. खोल्यांचा आकार लहान आहे. हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी बोलणी सुरू आहेत असं या प्रतिनिधीने सांगितलं.

भारतीय क्रिकेट संघ १४ किंवा १५ सप्टेंबरला जपानला रवाना होईल. १७ सप्टेंबरपासून महिला संघाचे सामने सुरू होतील तर पुरुष संघाचा पहिला सामना २८ तारखेला असणार आहे. भारताला बाय मिळाल्याने ते थेट क्वार्टरफायनलचा मुकाबला खेळणार आहेत.