महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट विश्वातील असे नाव आहे की ज्याच्या नावामागे भन्नाट हे विशेषण शोभून दिसते. श्रीलंकेविरोधातला तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताने मालिकाही खिशात घातली. मात्र आज झालेल्या सामन्यात निर्णायक ठरली ती धोनीने काढलेली उपल थरंगाची विकेट. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. मोठा धावफलक उभारून भारताला तणावात ठेवायचे हा त्यामागचा उद्देश अगदी उघड होता.

श्रीलंकेने सुरूवातही चांगली केली. १३ धावांवर दनुष्काला झेलबाद केल्यावर उपल धरंगा आणि समरविक्रमा या दोघांनी १३७ धावांची भागीदारी रचली आणि श्रीलंकेचा धावफलक १३ धावा १ बादवरून १३५ धावा १ बादपर्यंत पोहचला. त्यानंतर यजुवेंद्र चहलच्या बॉलवर शिखर धवनने समरविक्रमाचा झेल अचूक टिपला. समरविक्रमाच्या ४२ धावा करून तंबूत परतला. तरीही मैदानात थरंगा खेळत होता आणि सेटही झाला होता.  समरविक्रमाची विकेट गेली तेव्हा थरंगा ९० धावांवर खेळत होता. पुढच्या चेंडूला एक धाव आणि त्यानंतरच्या चेंडूला एक चौकार मारून त्याने ९५ धावाही पूर्ण केल्या. तो शतक झळकवणार की काय असे वाटत असतानाच टीम इंडियाचा ऑलराऊंडर प्लेयर महेंद्रसिंग धोनी याने थरंगाला स्टंप आऊट केले आणि त्यानंतर श्रीलंकेचा पूर्ण डावच फिरला.

भारताच्या गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगीच टाकली. सुरुवातीला श्रीलंकेने ज्या प्रकारे सुरूवात केली होती त्यावरून ते ३०० धावांपर्यंत मजल मारतील की काय  असे वाटले होते. मात्र थरंगाच्या हुकमी विकेटनंतर श्रीलंकेचा संघ अक्षरशः गडगडला आणि ४४.३ षटकात श्रीलंकेची अवस्था सर्वबाद २१५ इतकी बिकट झाली. जे लक्ष्य भारतीय टीमने अत्यंत सहजगत्या गाठले आणि सामना जिंकत मालिकाही खिशात घातली. थरंगाची विकेट धोनीने वेळीच काढली नसती तर चित्र कदाचित काहीसे वेगळे असते. मात्र अचूक टायमिंग साधत शतकाच्या जवळ असलेल्या थरंगाला माघारी धाडत धोनीने पुन्हा एकदा कमाल केली. टीम इंडियासाठी धोनी पुन्हा एकदा लकी ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.