WPL 2026 MI vs UPW: मुंबई इंडियन्सला युपी वॉरियर्जविरूद्ध यंदा सलग दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सकडून अमनजोत कौर व अमेलिया कर यांनी ४५ चेंडूत ८३ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. पण युपी वॉरियर्जची गोलंदाज शिखा पांडे हिने १९व्या षटकात उत्कृष्ट षटक टाकत युपीचा विजय निश्चित केला आणि यासह युपी मुंबईवर धावांनी शानदार विजय मिळवला.

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्ज यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि युपी वॉरियर्जला फलंदाजीसाठी पाचारण केलं.

मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट काय ठरला?

६९ धावांवर ५ विकेट्स गमावल्यानंतर अमनजोत कौर व अमेलिया कर या जोडीने संघाच्या डावाची जबाबदारी घेतली. या दोघींनी वादळी फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. धावा आणि चेंडूत मोठं अंतर असतानाही या दोघींनी युपीच्या गोलंदाजांवर हल्ला बोल करत धावा केल्या. दोघींनी अवघ्या ४५ चेंडूत ८३ धावांची भागीदारी केली. मेग लॅनिंगने १९वं षटक टाकण्याची जबाबदारी शिखा पांडेला दिली. शिखाने तिच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून घेत युपीचा विजय निश्चित केला.

शिखाने भेदक गोलंदाजी करत पहिल्या चेंडूवर एक धाव दिली, त्यानंतर पुढचा चेंडू डॉट बॉल गेला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सरळ फटका खेळण्यासाठी गेली आणि शिखा पांडेने तिला झेलबाद केलं. युपीसाठी ही मोठी विकेट ठरली आणि त्यामुळे मुंबईचा संघ १९व्या षटकात फक्त १९ धावा करू शकला आणि इथेच संघाचा विजय निश्चित झाला.

युपीने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खूप खराब झाली आणि संघाने झटपट टॉप फलंदाजी फळी गमावली. मुंबईची सलामी जोडी निश्चित न झाल्याने संघाला पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावावे लागत आहेत. हिली मॅथ्यूज १३ धावा, सजना सजीवन १३ धावा, नॅट स्किव्हर ब्रंट १५ धावा, हरमनप्रीत कौर १८ धावा तर निकोला कॅरी ६ धावा करत स्वस्तात बाद झाले. यानंतर आलेल्या अमेलिया कर व अमनजोत कौरने खोऱ्याने धावा केल्या. अमनजोत कौरने २४ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. तर अमेलिया करने २८ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ४९ धावा केल्या.

युपी वॉरियर्जने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८७ धावा केल्या. किरण नवगिरे गोल्डन डकवर क्लीन बोल्ड झाली. यानंतर मेग लॅनिंग व फिबी लिचफिल्ड यांनी उत्कृष्ट खेळी केल्या. कर्णधार लॅनिंग ४५ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. तर फिबी लिचफिल्ड ३७ चेंजूत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा करत बाद झाली. यानंतर हरलीन देओल २५ धावा, क्लो ट्रायन २१ धावा करत महत्त्वाचं योगदान दिलं. मुंबईकडून अमेलिया करने ३ विकेट्स, नॅट स्किव्हरने २ विकेट्स तर अमनजोत, हिली व निकोला कॅरी यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.