सुआरेझचा धमाका!

इंग्लंडला कसे पराभूत करायचे हे मला पक्के ठाऊक आहे, हे जायबंदी लुइस सुआरेझ ओरडून सांगत होता. अखेर प्रशिक्षकांनी त्यावर विश्वास दाखवला आणि उरुग्वेला हवाहवासा विजय सुआरेझने मिळवून दिला.

इंग्लंडला कसे पराभूत करायचे हे मला पक्के ठाऊक आहे, हे जायबंदी लुइस सुआरेझ ओरडून सांगत होता. अखेर प्रशिक्षकांनी त्यावर विश्वास दाखवला आणि उरुग्वेला हवाहवासा विजय सुआरेझने मिळवून दिला. दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकलेल्या सुआरेझने दोन गोलांची बरसात करत उरुग्वेला इंग्लंडवर २-१ असा थरारक विजय मिळवून दिला. सलग दोन्ही पराभवांमुळे इंग्लंडचे बाद फेरीतील स्थान धोक्यात आले आहे. इंग्लंडला आता जर-तर अशा समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करत सुआरेझने ३९व्या आणि ८५व्या मिनिटाला गोल करत गेल्या वेळी उपान्त्य फेरीत धडक मारणाऱ्या उरुग्वेला पहिला विजय मिळवून दिला. इंग्लंडला इटलीनंतर आता उरुग्वेकडूनही पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांच्यावर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. यापूर्वी १९५० आणि १९५८मध्ये इंग्लंड संघ पहिल्याच फेरीत विश्वचषकातून बाहेर पडला होता.
सुआरेझचा करिश्मा
लिव्हरपूलचा यशस्वी खेळाडू सुआरेझच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण ३९व्या मिनिटालाच त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले. एडिन्सन कावानीने दिलेल्या धीम्या गतीच्या पासवर सुआरेझने पुढे आलेला इंग्लिश गोलरक्षक जो हार्टला चकवून हेडरद्वारे पहिला गोल लगावला. रूनीच्या गोलनंतर १-१ अशी बरोबरी असताना ८४व्या मिनिटाला सुआरेझने निर्णायक गोल लगावला. लांबून मिळालेल्या पासवर चेंडूवर नियंत्रण मिळवत उजव्या बाजूने पुढे सरकल्यानंतर उजव्या पायाने जोरदार फटका लगावत सुआरेझने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली.
कमनशिबी रूनीचा विश्वचषकातील पहिला गोल
तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या वेन रूनीच्या वाटय़ाला आतापर्यंत फक्त अपयशच येत होते. उरुग्वेच्या सामन्यातही अनेक वेळा गोलने त्याला हुलकावणी दिली. १०व्या मिनिटाला फ्री-किकवर रूनीने मारलेला फटका गोलजाळ्याच्या अगदी बाजूने गेला. तसेच ३२व्या मिनिटाला उजव्या बाजूने फ्री-किकद्वारे मिळालेल्या क्रॉसवर अगदी गोलजाळ्याजवळ असलेल्या रूनीने मारलेला हेडर गोलजाळ्याला लागून बाहेर गेला. अनेक प्रयत्न हुकल्यानंतर अखेर ७५व्या मिनिटाला रूनीला यश मिळाले. उजव्या बाजूने डॅनियल स्टरिजकडून मिळालेल्या पासवर रूनीने धावत येऊन गोल केला. त्याचा हा विश्वचषकातील पहिला गोल ठरला.
माझ्यावर हसणाऱ्यांना गोल समर्पित -सुआरेझ
लिव्हरपूलकडून २०११पासून मी इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. पण तिथे माझी खिल्ली उडवण्याचे प्रयत्न जास्त होतात. या सामन्याआधीही इंग्लिश चाहत्यांनी माझी खिल्ली उडवली होती. माझ्यावर हसणाऱ्यांना हा गोल मी समर्पित करू इच्छितो. मी खेळलेल्या सामन्यांपैकी हा सर्वोत्तम सामना होता. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आता माझ्याबाबत ते काय विचार करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, असे विजय मिळवल्यानंतर सुआरेझने सांगितले.
..तरीही इंग्लंडला बाद फेरीची संधी
पहिल्या दोन सामन्यांत एकही गुण मिळवता न आलेल्या इंग्लंडला बाद फेरीची संधी मिळणार आहे. पण त्यासाठी इटलीला कोस्टा रिका आणि उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. इटलीवर विजय मिळवणारा संघ बाद फेरीचे तिकीट मिळवेल. मात्र इटलीने दोन्ही सामने जिंकल्यास इंग्लंडला अखेरच्या सामन्यात गोलफरकाच्या आधारावर कोस्टा रिकावर मात करावी लागणार आहे. तरच इंग्लंडला बाद फेरी गाठता येऊ शकते.
मी राजीनामा देणार नाही – हॉजसन
गेल्या ५६ वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडची सुमार कामगिरी झाली असली तरी इंग्लंडचे प्रशिक्षक रॉय हॉजसन यांचा राजीनामा देण्याचा विचार नाही. ‘‘सुआरेझने दुसऱ्या सत्रात केलेला गोल अप्रतिम होता. दोन सामन्यांमधील इंग्लंडच्या पराभवामुळे मी निराश झालो आहे. पण मी राजीनामा द्यावा, असे मला वाटत नाही. मात्र मी या पदासाठी योग्य नाही, असे इंग्लंड फुटबॉल असोसिएशनला वाटत असेल तर मला प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे लागेल,’’ असे हॉजसन यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uruguay vs england final score 2 1 suarez brace blasts

ताज्या बातम्या