क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला हे सोशल मीडियावर एकमेकांना तोंडघशी पाडण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसात दोघांनी एकमेकांची थेट नावे न घेता अनेक पोस्ट केल्या आहेत. ‘आरपी’ नावाचा क्रिकेटपटू माझी भेट घेण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबायचा, असा दावा उर्वशीने केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे.

२०१८ मध्ये, ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला एकमेकांना डेट करत होते, अशी चर्चा होती. दोघांनी कधीही याचा स्वीकार केला नव्हता. मात्र, आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादामुळे नक्कीच त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध होता, अशी चर्चा पुन्हा रंगली आहे. गुरुवारी (११ऑगस्ट) ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर ‘मेरा पिछा छोडो बहन’ अशी स्टोरी पोस्ट केली होती. ही स्टोरी त्याने काही मिनिटांनी डिलीटही केली.

उर्वशीने बॉलीवूड हंगामाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले होते, “मी नवी दिल्लीत शूटिंग करत होते. मी तिथे रात्री पोहोचले. अभिनेत्रींना तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी पटकन तयार होण्यासाठी गेले. तेव्हा ‘आरपी’ हॉटेलच्या लॉबीमध्ये माझी वाट बघत होता. पण, मी एकही कॉल अटेंड करू शकले नाही. काम संपवून झोपी गेले. या सर्व गोंधळात जवळपास दहा तास उलटले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मला १६-१७ मिस्ड कॉल दिसले. त्यावेळी मला खूप वाईट वाटले, कोणीतरी माझी वाट पाहत आहे आणि मी त्याला भेटू शकले नाही. त्यानंतर आम्ही मुंबईत भेटलो पण तिथेही गोंधळ झाला.”

हेही वाचा – ‘देशाचं नाव बदलून…’ मोहम्मद शमीच्या पत्नीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

उर्वशीच्या या मुलाखतीची चर्चा सुरू होताच, ऋषभने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. “थोड्या लोकप्रियतेसाठी आणि चर्चेत येण्यासाठी लोक मुलाखतींमध्ये किती खोटं बोलतात. काही लोक प्रसिद्धीसाठी इतके कसे हपापलेले आहेत. देव त्यांना सद्दबुद्धी देवो “#merapichachorhoBehen #Jhutkibhilimithotihai”, अशी स्टोरी त्याने पोस्ट केली होती.

ऋषभ पंतच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ऋषभ पंतच्या चाहत्यांनीही उर्वशी रौतेलावर टीका सुरू केली होती.