What is Written in Urvil Patel Note After Fastest Fifty Celebration: चेपॉकच्या मैदानावर उर्विल पटेल नावाचं वादळ पाहायला मिळालं. उर्विलने लखनौच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई करत १३ चेंडूत वादळी अर्धशतक झलकावलं. टी-२० इतिहासात वेगवान शतक करणाऱ्या उर्विल पटेलने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या एकाच खेळीच्या बळावर सर्वांची बोलती बंद केली. हे वादळी अर्धशतक झळकावल्यानं त्याने हात जोडत आणि सलाम करत सेलिब्रेशन केलं आणि नंतर खिशातून चिठ्ठी काढत ती दाखवली. या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं, जाणून घेऊया.

लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात, उर्विल पटेलने क्रीजवर येताच आपल्या बॅटने असा काही धुमाकूळ घातला की, सर्वच जण चकित झाले. त्याने सलग सात चेंडूंमध्ये सहा षटकार आणि एक चौकार लगावत वादळी फटकेबाजी केली. यासोबतच, उर्विलने अवघ्या १३ चेंडूंमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

चेपॉक स्टेडियमवर चेन्नईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना, लखनौ सुपर जायंट्सने २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, संजू सॅमसनने अवघ्या १४ चेंडूंमध्ये २८ धावा करून चेन्नईला स्फोटक सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर आलेल्या खऱ्या वादळासमोर संजूची फलंदाजी म्हणजे वादळापूर्वीची शांतताच जणू वाटली. याचं कारण होतं उर्विल पटेल, त्याने खेळपट्टीवर येताच सलग ३ षटकार लगावत सुरूवात केली.

मागील तीन सामन्यांमध्ये दमदार सुरुवात करूनही स्वस्तात बाद झालेल्या उर्विल पटेलचं यावेळी रौद्र रूप पाहायला मिळालं. आपल्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर, त्याने पुढच्या सलग सात चेंडूंवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने पाचव्या षटकात आवेश खानच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार लगावले. त्यानंतर, तो सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाजीला आला आणि उर्विलने दिग्वेश राठीच्या पुढच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले.

अशाप्रकारे, उर्विलने सलग पाच चेंडूंवर पाच षटकार मारून एकच खळबळ उडवून दिली. त्याला सलग सहावा षटकार मारता आला नसला, तरी त्याने या चेंडूवर एक चौकार मारला. पण पुढच्याच चेंडूवर उर्विलने पुन्हा चेंडू षटकारासाठी पाठवला. अशाप्रकारे, सलग सात चेंडूंवर ६, ६, ६, ६, ६, ४, ६ अशी वादळी फटकेबाजी केली. मोहम्मद शमीच्या षटकात चौकार-षटकार लगावत त्याने १३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

उर्विल पटेलच्या भावुक करणाऱ्या सेलिब्रेशनने वेधलं लक्ष

उर्विल पटेलने हे विक्रमी अर्धशतक झळकावल्यानंतर संपूर्ण चेन्नई सुपर किंग्सचा संघ डगआऊटमधून बाहेर आला आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करताना दिसला. इतक्यात उर्विलने खिशातून चिठ्ठी काढून सेलिब्रेशन केली. ही चिठ्ठी दाखवताना त्याचे हात चांगलेच थरथरत होते. त्याने काढलेल्या चिठ्ठीवर “बाबा हे तुमच्यासाठी” असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं.

उर्विल पटेलने या विक्रमी अर्धशतकानंतर बाद झाला. उर्विल पटेलने लखनौविरूद्ध सामन्यात २३ चेंडूत ८ षटकार व २ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं आहे.