IUrvil Patel Fastest Fifty In IPL History: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५३ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात उर्विल पटेलच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून युवा फलंदाज उर्विल पटेलने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. त्याने अवघ्या १३ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये यशस्वी जैस्वालची बरोबरी केली आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ २०४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला चांगल्या सुरुवातीची गरज होती. चेन्नईला ४५ धावांवर पहिला मोठा धक्का बसला. संजू सॅमसन २८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या उर्विल पटेलने चेपॉकवर षटकारांचं वादळ आणलं. आधी आवेश खानच्या गोलंदाजीवर त्याने लागोपाठ ३ खणखणीत षटकार खेचले. त्यानंतर पुढच्याच षटकात दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर लागोपाठ २ षटकार, मग चौकार आणि मग पुन्हा एकदा षटकार खेचला. त्याच्याकडे युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून ११ चेंडूत अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली . त्याने १३ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने यशस्वी जैस्वालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तो या स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे.
अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
उर्विल पटेलला पहिल्यांदाच आयपीएल खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्याच हंगामात त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. चेन्नईसारख्या ५ वेळच्या चॅम्पियन संघात संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करणं महत्वाचं असतं, हे उर्विल पटेलने करुन दाखवलं आहे. उर्विल पटेल हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी चेन्नईच्या कुठल्याही फलंदाजाला १३ चेंडूत अर्धशतक झळकावता आलेलं नाही. तसेच हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे. १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं असतं, तर त्याने युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली असती. पण हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला.
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक
- १३ चेंडू: उर्विल पटेल विरुद्ध LSG (२०२६)
- १३ चेंडू: यशस्वी जैस्वाल विरुद्ध KKR (२०२३)
- १४ चेंडू: रोमारियो शेफर्ड विरुद्ध CSK (२०२५)
- १४ चेंडू: पॅट कमिन्स विरुद्ध MI (२०२२)
- १४ चेंडू: केएल राहुल विरुद्ध DC (२०१८)
