अमेरिकन दूतावासाने ३१ जणांच्या पथकातील २१ सदस्यांना व्हिसा नाकारल्याच्या निषेधार्थ भारतीय तिरंदाजी असोसिएशनने (एएआय) जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पध्रेतून माघार घेतली आहे.
साऊथ डाकोटा येथे ८ ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी ३१ सदस्यांचा भारतीय संघ नवी दिल्लीतून शनिवारी अमेरिकेला रवाना होणार होता. मात्र संघातील दोन प्रशिक्षक, सात खेळाडू व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा एक अधिकारी यांनाच व्हिसा देण्यात आला आहे. परंतु दक्षिण कोरियन प्रशिक्षक चेई वोम लिम यांच्यासह उर्वरित २१ जणांना व्हिसा नाकारण्यात आला आहे. त्यामध्ये लिम यांच्याबरोबरच भारताचे मिम बहादूर गुरुंग, चंद्रशेखर लागुरी, राम अद्वेष हे तीन प्रशिक्षक व मसाजिस्ट पिंकी यांचा समावेश आहे.
भारतीय तिरंदाजी संघटनेचे कोषाध्यक्ष वीरेंदर सचदेव यांनी सांगितले की, ‘‘व्हिसा नाकारलेले खेळाडू व अन्य पदाधिकारी स्पर्धेनंतर अमेरिकेहून मायदेशी परत येणार नाहीत, अशी शंका आल्यामुळे तसेच त्यांनी मुलाखतीत योग्य रीतीने उत्तर न दिल्यामुळे त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला असावा. बरेचसे खेळाडू आसाम, झारखंड, पंजाब व उत्तर प्रदेशमधील अविकसित भागांतून आले असल्यामुळे त्यांना इंग्लिश व्यवस्थित बोलता आले नसावे. त्यामुळेही व्हिसाची मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यास उत्तर देताना त्यांना अडचण आली असावी. मात्र लिम यांना व्हिसा नाकारण्याचे कारण मला कळले नाही. ते जगातील ख्यातनाम प्रशिक्षक आहेत व त्यांनी जगात अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे.’’
‘‘अमेरिकन तिरंदाजी संघटनेचे निमंत्रण असताना व शासनाने शिफारस केली असतानाही व्हिसा का नाकारला गेला, हे कळू शकले नाही. याबाबत आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, तसेच क्रीडा मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे मात्र अद्याप याबाबत काहीही प्रगती झालेली नाही. अमेरिकन तिरंदाजी संघटनेच्या सल्ल्यानुसार या खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी व्हिसाकरिता पुन्हा अर्ज दाखल केला आहे,’’ असे सचदेव म्हणाले.

भारतीय तिरंदाजी पथकातील २० जणांना व्हिसा नाकारल्याच्या निषेधार्थ आम्ही जागतिक युवा अजिंक्यपद स्पध्रेतून माघार घेत आहोत. भारतीय तिरंदाजी असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांनी हा निर्णय घेतला आहे.
विरेंदर सचदेव, भारतीय तिरंदाजी असोसिएशनचे कोषाध्यक्ष