scorecardresearch

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : खाचानोवने किरियॉसचा झंझावात रोखला! – नव्या चेहऱ्यांची उपांत्य फेरीत धडक

एकूणच नामांकितांच्या पराभवांमुळे यावेळी नव्या चेहऱ्यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : खाचानोवने किरियॉसचा झंझावात रोखला! – नव्या चेहऱ्यांची उपांत्य फेरीत धडक
२७व्या मानांकित कॅरीन खाचानोवने ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचा झंझावात रोखला

न्यूयॉर्क : वेगवान सव्‍‌र्हिसवर खेळल्या गेलेल्या लढतीत २७व्या मानांकित कॅरीन खाचानोवने ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचा झंझावात रोखला. याचप्रमाणे महिला विभागात टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर आणि फ्रान्सची कॅरोलिना गार्सिया यांनी आक्रमक खेळ करत सरळ सेटमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. नॉर्वेच्या पाचव्या मानांकित कॅस्पर रूडनेही उपांत्य फेरी गाठली. एकूणच नामांकितांच्या पराभवांमुळे यावेळी नव्या चेहऱ्यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

जाबेऊरने ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमयानोविचचा ६-४, ७-६ (७-४) असा पराभव केला. गार्सियाने अमेरिकेच्या १८ वर्षीय कोको गॉफला ६-३, ६-४ असे नमवले. पुरुष एकेरीत रूडने बेरेट्टिनीचे आव्हान ६-१, ६-४, ७-६(७-४) असे परतवून लावले. खाचानोवने पाच सेटच्या संघर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या किरियॉसचा ७-५, ४-६, ७-५, ६-७ (३-७), ६-४ असा पराभव केला.

यंदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली, तेव्हा सर्वप्रथम जाबेऊर टेनिस विश्वात प्रकर्षांने झळकली. आता तेच सातत्य कायम राखताना जाबेऊरने अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत तिची गाठ नवोदित गार्सियाशी पडेल.

पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटला अनेकदा जाबेऊरची सव्‍‌र्हिस भेदण्यात टॉमयानोविचला यश आले. यामुळे जाबेऊर निराश झाली होती. अनेकदा जाबेऊरने रॅकेट कोर्टवर आपटली. याच निराशेवर मात करत जाबेऊरने टायब्रेकरमध्ये कमालीच्या संयमाने विजय निसटणार नाही याची काळजी घेतली.

स्पर्धेपूर्वी सिनसिनाटी स्पर्धेचे विजेतेपद आणि तेव्हापासून एकेरीत सलग १३ विजय मिळवून गार्सिया उपांत्य फेरीपर्यंत पोचली आहे. गार्सिया कमालीच्या आक्रमकतेने खेळली. पहिल्या १७ मिनिटांतच गार्सियाने चार गेम जिंकून आपले वर्चस्व आणि मनसुबे स्पष्ट केले. अचूक सव्‍‌र्हिस, खोलवर व्हॉली आणि बेसलाइनवरील ताकदवान फटक्यांनी गार्सियाने निर्विवाद वर्चस्व राखले.

खाचानोव आणि किरियॉस यांच्यातील लढत म्हणजे जणू सव्‍‌र्हिस युद्धच ठरले. अभावानेच रॅलीजचा खेळ या लढतीत पहायला मिळाला. वेगवान आणि बिनतोड सव्‍‌र्हिस करण्यात दोघांच्यात स्पर्धा लागली होती. पहिल्या सव्‍‌र्हिसवर सर्वाधिक यश मिळवून देखिल वेगावर नियंत्रण न राखल्याचा फटका किरियॉसला बसला. खाचानोवने येथेच बाजी मारताना आपले फटके नियंत्रित ठेवले. या लढतीत तब्बल ६१ बिनतोड सव्‍‌र्हिस बघायाल मिळाल्या. यात किरियॉसने ३१, तर खाचानोवने ३० बिनतोड सव्‍‌र्हिस केल्या.

याउलट बेरेट्टिनी आणि कॅस्पर रुड यांच्यातील लढत झाली. बेरेट्टीनीचा झंझावात रूडने तितक्याच शांतपणे नुसता सहन केला नाही, तर कमालीची अचूकता राखून तो परतवूनही लावला. बेसलाइनवरून खेळताना रुडने  बेरेट्टिनीला पूर्ण कोर्टवर पळवून त्याच्या क्षमतेची कसोटी पाहिली. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर तिसरा सेट टायब्रेकरमध्ये नेल्याचेच  बेरेट्टिनीला समाधान लाभले. रुडने या विजयाने आपले जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान जणू निश्चित केले.

माझा स्वत:वर कमालीचा विश्वास आहे. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर मी कमालीच्या सकारात्मक दृष्टिकोनातून खेळत आहे. विम्बल्डनची अंतिम लढत हरले असले, तरी माझ्याकडे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्याची क्षमता आहे, हे जाणवले आणि त्यादृष्टीने येथे एक पाऊल पुढे पडले आहे. उपांत्य फेरीत मी अधिक चांगला खेळ करेन.

– ओन्स जाबेऊर

केशकर्तनाचा अडथळा!

किरियॉस आणि खाचानोव यांच्यातील सव्‍‌र्हिसचे युद्ध रंगात होते, तेव्हा प्रेक्षकांत वेगळीच गडबड सुरू होती. लढतीदरम्यान एक व्यक्ती चक्क नाभिकाकडून केस कापून घेत होता. हे समजल्यावर सर्वाच्या नजरा तिकडे वळल्या. ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान प्रथमच असे काही घडत होते. अखेरीस या दोघांना सुरक्षारक्षकांनी बाहेर काढले. मग विनाव्यत्यय सामना पार पडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us open 2022 karen khachanov beats nick kyrgios to reach first grand slam semi final zws

ताज्या बातम्या