वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
टेनिसविश्वातील वलयांकित सेरेना आणि व्हीनस विल्यम्स भगिनी चार वर्षांच्या कालावधीनंतर एकत्रित खेळण्यास कोर्टवर उतरल्या. त्यांनी झुंजही दिली. मात्र, अखेरीस त्यांच्या पदरी निराशाच पडली. मायदेशातील अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला दुहेरीतील पहिल्याच फेरीत विल्यम्स भगिनींना १४व्या मानांकित चॅन हाओ-चिंग आणि माया जॉइंट यांच्या जोडीकडून ६-३, ६-७ (६-८), ६-७ (७-१०) असा पराभव पत्करावा लागला.
निर्णायक ‘टायब्रेक’मध्ये विल्यम्स भगिनींनी ५-० अशी आघाडी घेतली होती. विजयापासून त्या अवघ्या पाच गुणांवर होत्या. आर्थर ॲश स्टेडियम चाहत्यांच्या जल्लोषाने दणाणून गेले होते आणि सामना त्यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र होते. मात्र, चॅन आणि माया यांनी हार मानली नाही. त्यांनी अखेरचे १२ पैकी १० गुण मिळवत सामन्यात बाजी मारली आणि दुसरी फेरी गाठली.
दोन्ही भगिनींचे एकत्रित वय
९० वर्षे असले, तरी त्यांची लोकप्रियता आणि मैदानावरील लढाऊ वृत्ती अजूनही तितकीच प्रभावी असल्याचे या सामन्यात पुन्हा दिसून आले. स्टेडियममधील २० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या अमेरिकन खेळाडूंना प्रचंड उत्साहाने पाठिंबा दिला. ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला दुहेरीतील पहिल्याच फेरीच्या सामन्याला रात्रीच्या सत्राचे प्रमुख आकर्षण (मेन इव्हेंट) मिळणे ही दुर्मीळ बाब. सेरेना आणि व्हीनस २०२२ नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकत्र खेळल्या. त्यामुळे हा सामना विशेष आकर्षणाचा ठरला.
निवृत्ती मागे घेत याच वर्षी व्यावसायिक टेनिसमध्ये परतलेल्या ४४ वर्षीय सेरेना आणि ४६ वर्षीय व्हीनसने चाहत्यांना निराश केले नाही. त्यांनी पहिला सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट ‘टायब्रेकर’मध्ये गमावल्यानंतर तिसर्या सेटमध्ये त्यांनी १-४ अशा पिछाडीवरून पुनरागमन केले. मात्र, ‘टायब्रेकर’मधील चुकांचा त्यांना फटका बसला.
सबालेन्काच्या सामन्यात ‘वेगळाच’ व्यत्यय
’ अमेरिकन स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना सबालेन्काने तिसर्या फेरीच्या लढतीत कझाकस्तानच्या कामिला रखिमोवाचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला. या सामन्यादरम्यान ‘गांजा’च्या तीव्र वासामुळे काही काळ व्यत्यय निर्माण झाला.
’ पहिल्या सेटमध्ये ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर सबालेन्काने पंचांकडे याबाबत तक्रार केली. ‘कोणीतरी गांजा ओढत आहे,’ असे सबालेन्काने पंचांना सांगितले. वास अत्यंत तीव्र असल्याने हस्तक्षेप करण्याची विनंतीही तिने केली.
’ सामन्यानंतर सबालेन्काने या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. हा वास नेमका प्रेक्षकांकडून आला की बाहेरून वार्याबरोबर स्टेडियममध्ये आला, हे तिला स्पष्ट झाले नसले, तरी सामन्यादरम्यान अशा वासाचा सामना करणे कठीण असल्याचे तिने सांगितले.
’ फ्लशिंग मेडोजच्या परिसरात धूम्रपान करण्यास परवानगी नसली, तरी जवळच्या कोरोना पार्कमधून गांजाचा वास अधूनमधून स्टेडियमपर्यंत पोहोचतो. न्यूयॉर्कमध्ये प्रौढांना गांजा ओढण्यास कायदेशीर परवानगी आहे.
’ या स्पर्धेत गांजाच्या वासामुळे त्रस्त झालेली सबालेन्का ही पहिली खेळाडू नाही. यापूर्वी केटी बोल्टर, हॅरिएट डार्ट, फ्रान्सेस्का जोन्स, नोव्हाक जोकोविच आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांसारख्या खेळाडूंनीही अशा प्रकारच्या अनुभवाबद्दल तक्रार केली होती.
अल्कराझची घोडदौड
पुरुष एकेरीत दुसर्या मानांकित कार्लोस अल्कराझने विजयी घोडदौड सुरू ठेवताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने चीनच्या यिबिंग वू याला ६-३, ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये नमवले. महिलांमध्ये सातव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाला मात्र पराभवाचा धक्का बसला. विम्बल्डन उपविजेत्या मुचोवाला एमा नावारोने ३-६, ५-७ असे पराभूत केले.
