न्यूयॉर्क : यंदाची अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारी अरिना सबालेन्का आणि स्पर्धेदरम्यान सबालेन्काला मागे टाकत अग्रस्थान गाठलेली एलिना रायबाकिना यांच्यात महिला एकेरीच्या जेतेपदाची लढत खेळवली जाणार आहे. रायबाकिनाने अमेरिकन चाहत्यांच्या आशांवर पाणी फेरताना उपांत्य फेरीत यजमान देशाच्या कोको गॉफवर मात केली. पहिला सेट गमावल्यानंतरही जिद्द न सोडता तिने पिछाडीवरून मुसंडी मारली. दुसरीकडे, सबालेन्कानेही अमेरिकेच्याच जेसिका पेगुलाचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
त्यामुळे आता अजिंक्यपदासाठी दोन सर्वोच्च मानांकित खेळाडूच आमनेसामने येणार आहेत. उपांत्य लढतीत रायबाकिनाला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. मात्र, पहिला सेट गमावल्यानंतर तिने शानदार खेळ करताना गॉफवर ३-६, ६-४, ६-४ अशी मात केली. गॉफने सामन्याची सुरुवात आत्मविश्वासाने केली. सहाव्या गेममध्ये तिने रायबाकिनाची स्व्हिहस भेदली आणि पहिला सेट अवघ्या ३८ मिनिटांत आपल्या नावे केला. तिच्या खेळाला प्रेक्षकांकडून सातत्याने दाद मिळत होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांचीही सामन्याला उपस्थिती होती.
दुसर्या सेटमध्ये रायबाकिनाने दमदार पुनरागमन केले. तिला गॉफच्या खेळातील काही चुकांचाही फायदा मिळाला. आपल्या ताकदवान फटक्यांचा प्रभावी वापर करत तिने दुसरा सेट जिंकला आणि सामना निर्णायक सेटमध्ये नेला. तिसर्या सेटमध्ये रायबाकिनाने अचूक खेळ करताना ५-३ अशी भक्कम आघाडी मिळवली होती. गॉफने प्रतिकार करत रायबाकिनाची स्व्हिहस भेदली. मात्र, तिला स्वत:ची स्व्हिहस राखण्यात अपयश आले. त्यामुळे रायबाकिनाने बाजी मारत कारकीर्दीतील तिसर्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले.
रायबाकिनाने वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील विजयासह केली होती. त्यात तिने सबालेन्कालाच पराभूत केले होते. त्यानंतर फ्रेंच (दुसरी फेरी) आणि विम्बल्डन (तिसरी फेरी) स्पर्धा तिच्यासाठी निराशाजनक ठरली. मात्र, पुन्हा हार्ड कोर्टवर शानदार खेळ करत तिने अमेरिकन स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
कोको गॉफवरील विजयानंतर रायबाकिनाने सामन्यादरम्यानच्या मानसिक संघर्षाबद्दल सांगितले. ‘‘गॉफ गुणवान खेळाडू आहे आणि तिच्याविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. पहिला सेट गमावल्यानंतर साहजिकच दडपण जाणवत होते. मी दीर्घ श्वास घेतला आणि स्वत:शीच संवाद साधला. सकारात्मक दृष्टिकोन राखण्याचा माझा प्रयत्न होता. मला फक्त लढत राहायचे होते. मला यश मिळाले याचे निश्चितच समाधान आहे,’’ असे रायबाकिना म्हणाली.
सबालेन्काला हॅट्ट्रिकची संधी
टेनिसमधील सध्याची सर्वोत्तम महिला खेळाडू अशी ख्याती असलेल्या अरिना सबालेन्काने अमेरिकन खुल्या स्पर्धेत सलग तिसर्या जेतेपदाची संधी निर्माण केली आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत अग्रमानांकित सबालेन्काने अमेरिकेची तिसरी मानांकित खेळाडू जेसिका पेगुला हिच्यावर ७-५, ६-२ अशी मात केली. अमेरिकन स्पर्धेत सलग चार वेळा अंतिम फेरी गाठणारी ती सेरेना विल्यम्सनंतरची (२०११-१४) पहिलीच खेळाडू ठरली.
अंतिम लढतीत सबालेन्काविरुद्ध खेळणे सोपे नसेल. ती उत्कृष्ट खेळाडू असून या स्पर्धेतही तिने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे तिला हरवण्यासाठी मला सुरुवातीपासून पूर्ण ताकदीने आणि अचूक खेळ करावा लागेल. या सामन्यासाठी मी उत्सुक आहे. – एलिना रायबाकिना
