वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : कारकीर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित म्हणून खेळणार्‍या जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेवला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सलामीलाच तब्बल ४ तास ५३ मिनिटे संघर्ष करावा लागला. स्थानिक वेळेनुसार, मध्यरात्री १.५५ वाजता संपलेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात झ्वेरेवने इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोवर ६-४, ३-६, ६-७ (७-९), ७-५, ६-४ असा विजय मिळवला.

पहिले तीनपैकी दोन सेट गमावल्याने झ्वेरेव दडपणखाली होता. त्यातच चौथ्या सेटमध्ये ४-५ अशा पिछाडीवर असताना स्वत:च्या स्व्हिहसवर एकवेळ त्याला ३०-३० अशा बरोबरीवर राहावे लागले होते. पराभवापासून तो केवळ दोन गुण दूर होता. मात्र, त्या निर्णयाक क्षणी त्याने खेळावर नियंत्रण मिळवले आणि मॅरेथॉन लढतीतील संघर्षाचे विजयात रुपांतर केले. विजयानंतर सुटकेचा नि:श्वास टाकत झ्वेरेवने सर्वोत्तम लढतीत विजय मिळवल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.

‘‘मी जिंकलो याचा मला आनंद आहे, बस एवढेच म्हणेन. सामन्यात खूप चढ-उतार आले. पहिल्या फेरीसाठी जवळपास पाच तास लागले. मला वाटते की हा माझ्या कारकीर्दीतील सर्वांत मोठा पहिल्या फेरीचा सामना आहे. सोनेगोला याचे श्रेय जाते. तो अप्रतिम टेनिस खेळला. तो नक्कीच इतर अनेक खेळाडूंना हरवू शकला असता,’’ असे झ्वेरेव म्हणाला.

सोनेगोविरुद्ध झ्वेरेवने सलग सातवा विजय मिळवला असला, तरी या वेळी जागतिक क्रमवारीत ८९व्या स्थानावर असलेल्या सोनेगोने नेटवर आक्रमक खेळाचे सुरेख दर्शन घडवत एकवेळ झ्वेरेवला पराभवाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. यंदा फ्रेंच स्पर्धा जिंकल्यानंतर झ्वेरेव येथे वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच फेरीत त्याला लय शोधण्यासाठी वेळ घ्यावा लागला. अनपेक्षित चुकांमुळे झ्वेरेव अडचणीत येत राहिला. मात्र, लढत पुढे सरकत होती, तसा झ्वेरेवचा खेळ सुधारत गेला.

गॉफचा विजय; अमेरिकेची टेनिसपटू कोको

गॉफने महिला एकेरीत विजयी सुरुवात केली. गॉफने झेनेप सोनमेझचा ६-३, ६-४ असा पराभव केला. फिलिपिन्सच्या अलेक्झांड्रा एला हिने स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. एलाने अमेरिकेच्या पात्रता फेरीतून आलेल्या मेरी स्टोयानाला ६-१, ६-२ असे नमवले. फ्रेंच स्पर्धेच्या विजेत्या मीरा आंद्रीवाने इंडोनेशियाच्या ३६व्या मानांकित जॅनिस तजेनवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या एलेना रायबाकिनाने अमेरिकेच्या थेआ फ्रॉडिनचा ६-३, ६-२ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.

बेंचिचचा संताप

महिला एकेरीत बाराव्या मानांकित बेलिंडा बेंचिचला कझाकस्तानच्या युलिया पुतिंतसेवाविरुद्ध ६-४, ५-७, ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला. दुसर्‍या सेटमध्ये स्व्हिहस भेदली गेल्यानंतर बेंचिच १-२ अशी मागे होती. तेव्हा तिने रागाच्या भरात मागे न पाहता कोर्टच्या पाठी जोरात चेंडू मारला, तो थेट प्रेक्षक गॅलरीत एका प्रेक्षकाला हलकासा स्पर्श करून गेला. या घटनेनंतर प्रतिस्पर्धी पुतिंतसेवा हिने २०२० मधील नोव्हाक जोकोविचच्या कृतीची आठवण करून देत बेंचिचला अपात्र ठरविण्याची मागणी केली. मात्र, पंचांनी बेंचिचकडून ही चूक अनवधानाने घडल्याचे सांगितले.