वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : रात्रीचा दिवस करून खेळल्या जाणार्‍या यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत यजमान देशाचा बेन शेल्टन आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांच्यातील लढतीने थराराची परिसीमा गाठली. मंगळवारी रात्री सुरू झालेली ही मॅरेथॉन लढत स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.३३ वाजता संपली. इतक्या उशिरापर्यंत चाललेल्या सामन्यातही जवळपास पूर्ण भरलेल्या आर्थर ॲश स्टेडियममधील प्रेक्षकांचा उत्साह शेवटपर्यंत कायम राहिला. यात शेल्टनने ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील सर्वांत मोठा विजय मिळवताना गतविजेत्या अल्कराझला ‘चीत’ केले.

उत्तररात्रीचे तास पुढे सरकत असताना अल्कराझची निराशा वाढत चालली होती. सुरुवातीला एकाग्र होऊन लढा देणार्‍या अल्कराझची ऊर्जा हळूहळू संपत गेली. त्याला उलट्याही झाल्या. एका टप्प्यावर त्याला चेंडू कोर्टमध्ये ठेवणेही कठीण जात होते. त्याने सलग नऊ गेम गमावले. मात्र, या अशक्यप्राय परिस्थितीतूनही त्याने पुन्हा सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे ही वर्षातील सर्वांत उल्लेखनीय लढतींपैकी एक ठरली. दुसर्‍या मानांकित अल्कराझचे प्रयत्न अखेर शेल्टनने हाणून पाडला.

आठव्या मानांकित शेल्टनने

४ तास २९ मिनिटांच्या झुंजीनंतर अल्कराझचा ६-७ (५-७), ६-१, ६-३, १-६, ७-६ (१०-७) असा पराभव केला. ही अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या इतिहासात सर्वांत उशिरा संपलेली लढत ठरली. या विजयासह डावखुर्‍या शेल्टनने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता त्याची गाठ अमेरिकेच्याच फ्रान्सिस टियाफोशी पडेल. टियाफोने ॲलेक्स मिचेलसेनचा ५-७, ३-६, ७-५, ६-३, ७-६ (१०-६) असा पराभव करत तिसर्‍यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरीत धडक मारली. पहिले दोन सेट गमावल्यानंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये ०-३ अशी पिछाडी भरून काढत टियाफोने विजयावर शिक्कामोर्तब केले. या शतकात अमेरिकन खुल्या स्पर्धेत तीन उपांत्य फेर्‍यांमध्ये पोहोचणारा टियाफो हा आंद्रे आगासीनंतरचा पहिला अमेरिकन पुरुष खेळाडू ठरला आहे.

सबालेन्काचा संघर्ष

गतविजेत्या अरिना सबालेन्काला महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत संघर्ष करावा लागला. सबालेन्काने लिंडा नोस्कोव्हाला ७-६ (७-१), ३-६, ७-६ (१०-७) असे नमवले. आता उपांत्य फेरीत तिची जेसिका पेगुलाशी गाठ पडणार आहे. पेगुलाने २६व्या मानांकित एमा नव्हारोचा ३-६, ६-४, ६-३ असा पराभव केला.

‘यजमानां’च्या खेळाडंूना संधी

अल्कराझच्या पराभवामुळे यंदाच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, हा विजेता अमेरिकेचाही असू शकतो. कारण एका उपांत्य लढतीत बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो हे दोन अमेरिकेचेच खेळाडू आमनेसामने येणार आहेत. अमेरिकेच्या अँडी रॉडिकने २३ वर्षांपूर्वी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर एकाही अमेरिकन पुरुष खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

सर्वांत उशिरा विजय आणि पराभव…

अमेरिकन खुल्या स्पर्धेत सर्वांत उशिरा सामना जिंकण्याचा आणि पराभव स्वीकारण्याचा विक्रम आता अल्कराझच्या नावावर आहे. यापूर्वी २०२२मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अल्कराझने यानिक सिन्नेरविरुद्धचा सामना स्थानिक वेळेनुसार पहाटे २.५० वाजता संपवून विजय मिळवला होता. आता हा विक्रम मागे पडला. मात्र, यावेळी पहाटे ३.३३ वाजता संपलेल्या सामन्यात त्याला शेल्टनविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे, माझी अपेक्षा फक्त कोर्टवर उतरून स्पर्धा करणे आणि पूर्णपणे तंदुरुस्त राहून अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळणे हीच होती. दुखापतीतून परतल्यानंतर मी ज्या प्रकारे लढा दिला, त्याचा मला अभिमान आहे. तिसर्‍या सेटनंतर मी खूप थकलो होतो. मात्र, मानसिकदृष्ट्या स्वत:ला मजबूत ठेवण्याचा आणि शारीरिकदृष्ट्या उरलेली ताकद पणाला लावण्याचा मार्ग मी शोधला. शेवटी विजय मिळाला नसला तरी मी निराश नाही. – कार्लोस अल्कराझ

कार्लोस वयाच्या अवघ्या २३व्या वर्षीच टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक बनला आहे. त्याच्याविरुद्ध कोर्टवर खेळताना नेहमीच खूप मजा येते. त्याचे काही फटके थक्क करणारे असतात. हा नक्कीच माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक आनंद देणारा सामना होता. – बेन शेल्टन