सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे सर्वाधिक २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले. जोकोविचला रविवारी रात्री अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने जोकोविचचा पराभव करत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. जर जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकली असते तर त्याने आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले असते. पण मेदवेदेवने जोकोविचचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव करत त्याचे स्वप्न भंग केले.

२५ वर्षीय मेदवेदेव २०१९ मध्ये प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता पण त्याला स्पेनच्या राफेल नदालच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, यावेळी त्याने कोणतीही चूक केली नाही आणि जेतेपद पटकावले. जोकोविच १९६९ नंतर कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू होण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता. रॉड लीव्हरने ५२ वर्षांपूर्वी हंगामातील सर्व चार ग्रँडस्लॅम जिंकले होते. स्टेफी ग्राफ १९८८ मध्ये असे करणारी महिला खेळाडू होती. लिव्हरने हे १९६२ मध्ये देखील केले होते. जर जोकोविचने विजेतेपद मिळवले असते, तर हा त्याचे २१वे ग्रँड स्लॅम हे विक्रमी ठरले असते.

अंतिम सामन्यात मेदवेदेव सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. तर जोकोविच दडपणाखाली दिसला. मेदवेदेवने जोकोविचचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. सुमारे अडीच तास चाललेल्या या सामन्यात जोकोविच प्रत्येक सेटमध्ये मेदवेदेवच्या मागे राहिला. सामना संपल्यानंतर मेदवेदेव थकून कोर्टवरच झोपला.

विजयानंतर डॅनिल मेदवेदेवने जोकोविचची माफी मागितली. “सर्वप्रथम मी तुम्हाला आणि तुमच्या चाहत्यांना सॉरी म्हणतो. आज काय झाले हे आपल्या सर्वांना माहित आहे. या वर्षी आणि तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय साध्य केले आहे? मी हे यापूर्वी कधीही सांगितले नाही. माझ्यासाठी तुम्ही इतिहासातील महान टेनिसपटू आहात,” असे मेदवेदेवने म्हटले.