एपी, न्यूयॉर्क : अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात उशिराने संपणार्या सामन्यांमुळे खेळाडूंसह प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. महत्त्वाच्या खेळाडूंचे सामने रात्री उशिरा सुरू होऊन संपण्यास उत्तररात्र ओलांडत असल्यामुळे अनेक वेळा स्टेडियममधील खुच्र्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. पहिल्या दोन फेरीत मध्यरात्रीपर्यंत खेळावे लागल्यानंतर, ॲलेक्झांडर झ्वेरेवने लढत संपल्यावर मला वाटते प्रत्येक जण थकला आहे. प्रत्येकाला आता झोपायचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
कधी न झोपणारे शहर म्हणून न्यूयॉर्कची ओळख असली, तरी यंदा जास्तच अतिरेक होत आहे. खेळाडूंना देखील येथील रात्रींच्या सामन्यांचे आकर्षण असते. प्रकाशझोतात सामने पाहण्यासाठी चाहते देखिल उपस्थित असतात. पण, यंदा स्पर्धेत पहिल्या सहा दिवसांतच उत्तररात्री दोन नंतर सामने संपण्याच्या तीन विक्रमी घटना घडल्या आहेत, तसेच आणखी दोन सामने रात्री एकच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे अशा मोठ्या मंचावर मध्यरात्रीनंतर संपणार्या सामन्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही सामने एका ठरावीक वेळेत सुरू होऊन संपतील याची खात्री करणे आवश्यक आहे. सामने खरोखरच रात्री दोनपर्यंत खेळवणे आवश्यक आहे का? याचा विचार होण्याची गरज असल्याचे तिसरी मानांकित जेसिका पेगुला म्हणाली.
विम्बल्डनने रात्री ११ वाजताची मर्यादा लागू केली आहे. फ्रेंच स्पर्धेत रात्री फक्त एकच सामना खेळवला जातो. अमेरिकन स्पर्धेत उशिरापर्यंत खेळ चालतो, पण यावेळी तो एका टोकाला गेला आहे. उद्घाटनाच्या रात्री, व्हीनस विल्यम्सला अमेरिकन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात उशिरा म्हणजेच रात्री १२:१३ वाजता सामना सुरू करावा लागला, कारण पहिल्या फेरीत नोव्हाक जोकोविचला पराभूत होण्यासाठी ४ तास ३६ मिनिटे लागली.
‘‘हे अजिबात योग्य नाही. मी नक्कीच यापेक्षा काहीतरी वेगळी वेळ पसंत केली असती. आमच्या दोघांसाठीही हे चांगले नव्हते, त्यामुळे मला वाटते की आम्ही दोघांनीही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. मला असा दुसरा कोणताही खेळ माहित नाही जिथे तुम्हाला इतक्या उशिरा खेळ सुरू करावा लागतो. मला नक्कीच वाटते की यामध्ये सुधारणेला वाव आहे,’’ असे व्हिनस म्हणाली.
झ्वेरेवचे पहिले दोन सामने रात्री १:५५ आणि २:१५ वाजता संपले, ज्यामुळे १९६८ पासून सुरू झालेल्या ग्रँडस्लॅमच्या सुरुवातीला सलग दोन पाच सेटचे सामने खेळणारा तो पहिला आघाडीचा खेळाडू ठरला. बेन शेल्टनचा शुक्रवारी रात्री सुरू झालेला दुसर्या फेरीचा सामना शनिवार, उत्तररात्री २:०७ वाजेपर्यंत चालला, कारण विल्यम्स भगिनींचा दुहेरीचा सामना तीन तासांपेक्षा जास्त काळ चालला होता.
स्पर्धेच्या इतिहासातील १७ सर्वात उशिरा संपलेल्या सामन्यांपैकी चार सामने याच वर्षी झाले आहेत. यापूर्वीचा विक्रम उत्तररात्री २:५० वाजताचा आहे, जेव्हा २०२२ च्या उपांत्यपूर्व फेरीत कार्लोस अल्काराझने यानिक सिन्नेरला हरवून आपले अमेरिकन स्पर्धेच्या पहिल्या विजेतेपदाकडे पाऊल टाकले होते. अमेरिकन टेनिस स्पर्धेत यंदाच्या वर्षी रात्री विलंबाने होणार्या सामन्यात प्रेक्षकांची रोडावलेली संख्या खेळाडूंच्या कौशल्याइतकीच चर्चेची ठरत आहे.
जेव्हा तुम्ही उशिरा सामना संपवता, तेव्हा तुमचा पुढचा दिवस खूप बदलतो. तुम्हाला तुमची झोप पूर्ण करावीच लागते, त्यामुळे तुमची सुरुवात उशिरा होते आणि तुमचे संपूर्ण वेळापत्रक बिघडू शकते – अरिना सबालेन्का.
सबालेन्का, अल्कराझची अपेक्षित आगेकूच
- गतविजेत्या अरिना सबालेन्का आणि कार्लोस अल्कराझ यांनी विजेतेपद राखण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले. त्यांनी आपापल्या लढतीत विजय मिळवत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
- सबालेन्काने टेलर टाउनसेंडवर ६-४, ६-३, महिला गटाच्या अन्य सामन्यात जेसिका पेगुलाने सोराना सिरस्टेआचा ६-३, ६-४ असा सरळ देन सेटमध्ये पराभव केला. तर, लिंडा नोस्कोवाने मार्टा कोस्त्युकवर ७-५, ५-७, ६-४ असा विजय मिळवला. अमेरिकेच्या एमा नवारोने ॲना कालिन्सकायाला ६-४, ६-२ असे पराभूत केले.
- पुरुष एकेरीत दुसर्या मानांकित अल्कराझने टॉमी पॉलवर ६-४, ६-३, ६-४ असा सहज पराभव केला. अल्कराझने आक्रमक खेळ करीत त्याला टॉमला पुनरागमन करण्याची फारशी संधी दिली नाही. सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला पराभवाचा सामना करावा लागला.
- अमेरिकेच्या फ्रान्सिस्को टिआफोने मेदवेदेवचे आव्हान ७-६ (७-१), ६-४, ७-६ (८-६) असे संपुष्टात आणले. तर, बेन शेल्टनने स्टेफानोस त्सित्सिपासची घोडदौड ६-२, ६-३, ६-४ अशी रोखली. ॲलेक्स मिचेलसेन याने टॉमस मार्टिन एचेव्हेरीचा ७-६ (८-६), ६-४, ६-४ असा पराभव केला.
