वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅमला आज, रविवारपासून न्यूयॉर्कमध्ये सुरुवात होणार असून, यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेत्या कार्लोस अल्कराझचे पुनरागमन हेच सर्वांत मोठे आकर्षण ठरणार आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे जवळपास पाच महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिल्यानंतर अल्कराझ पुन्हा कोर्टवर उतरून एकेरीतील जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी त्याला नोव्हाक जोकोविच आणि ॲलेक्झांडर झ्वेरेव यांसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

अल्कराझने वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. त्यानंतर एप्रिलमध्ये बार्सिलोना स्पर्धेत दुखापतीमुळे माघार घेतली. पुढे त्याला फ्रेंच, विम्बल्डन आणि उत्तर अमेरिकेतील महत्त्वाच्या हार्ड कोर्ट स्पर्धांना मुकावे लागले. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने याच आठवड्यात अमेरिकन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतून स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले. तो सेरेना विल्यम्सच्या साथीने खेळला. मात्र, त्याच्या खेळात पूर्वीसारखी सहजता दिसून आली नाही. आता एकेरीत त्याला सूर गवसतो का, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

पहिल्याच फेरीत अल्कराझसमोर रोमन सफिउलिनचे आव्हान आहे. यात विजय मिळवल्यास पुढील फेर्‍यांमध्ये आर्थर फिल्स किंवा बेन शेल्टनसारखे आक्रमक खेळाडू त्याची परीक्षा पाहू शकतात. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविच, डॅनिल मेदवेदेव, फ्रान्सिस टियाफो आणि ब्रँडन नाकाशिमा यांच्यापैकी एखादा प्रतिस्पर्धी त्याच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

जेतेपदासाठी चुरस

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला यानिक सिन्नेर दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे जेतेपदाची शर्यत अधिक खुली झाली आहे. अल्कराझसाठी ही पुनरागमनाची स्पर्धा आहे. सिन्नेरच्या अनुपस्थितीत झ्वेरेवला अग्रमानांकन मिळाले असून, त्याने यंदाच्या हंगामात फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्याच वेळी जोकोविच विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचे ध्येय बाळगून आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर अमेरिकेचे बेन शेल्टन, फ्रान्सिस टियाफो आणि टेलर फ्रिट्झ यांच्यावरही लक्ष असेल. त्यामुळे पुरुष एकेरीत जेतेपदासाठी तगडी स्पर्धा अपेक्षित आहे.

सबालेन्काचेच वर्चस्व? महिलांमध्ये जेतेपदासाठी पुन्हा

अरिना सबालेन्कालाच प्रमुख दावेदार मानले जात आहे. ती या स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील असून, सलामीला तिच्यासमोर कॅमिला ओसोरिओचे आव्हान असेल. दुसरी मानांकित एलिना रायबाकिना विरुद्ध आठवी मानांकित इगा श्वीऑटेक, तिसरी मानांकित जेसिका पेगुला विरुद्ध सातवी मानांकित कॅरोलिना मुचोव्हा, तसेच चौथी मानांकित कोको गॉफ विरुद्ध पाचवी मानांकित मीरा आंद्रीवा यांच्यात संभाव्य उपांत्यपूर्व सामने होऊ शकतात.

पहिल्या फेरीचे सामने ’ वेळ : रात्री ८.३० पासून
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, जिओहॉटस्टार ॲप