वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : ग्रँडस्लॅम कारकीर्दीत प्रथमच अग्रमानांकित म्हणून खेळणार्या जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेवला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सलग दुसर्या सामन्यात पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. यानंतरही झ्वेरेवला विजय मिळवण्यात यश आले. मात्र, याबाबत तो फारसा समाधानी नव्हता. दुसर्या फेरीतील लढतीत माझी कामगिरी अत्यंत ‘खराब’ होती, असे सामन्यानंतर झ्वेरेव म्हणाला.
फ्रेंच स्पर्धेतील विजेतेपदानंतर झ्वेरेवकडून अपेक्षा वाढल्या. अमेरिकन स्पर्धेतही त्याने आगेकूच कायम राखली असली, तरी अद्याप त्याला सर्वोत्तम खेळ करता आलेला नाही. पहिल्या फेरीत त्याला लॉरेन्झो सोनेगोने पाच सेट झुंजवले. आता दुसर्या फेरीत फ्रान्सच्या क्वेंटिन हॅलिसने पुन्हा एकदा पाच सेटपर्यंत त्याच्या क्षमतेची कसोटी पाहिली. झ्वेरेवने ही लढत ६-४, ४-६, ७-६ (७-३), ६-७ (३-७), ६-३ अशी जिंकली. झ्वेरेव एकंदर कामगिरीबाबत नाखुश असला, तरी विजय मिळवणे सर्वांत महत्त्वाचे असे सांगत त्याने लवकरच सर्वोत्तम लय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
‘‘मला पहिल्या दोन लढतींत संघर्ष करावा लागला हे खरे असले, तरी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी चांगल्या स्थितीत आहे. मी खराब खेळूनही जिंकत आहे. जेव्हा तुम्ही सर्वोत्तम टेनिस खेळत नसता, तेव्हा कसे जिंकायचे हे माहीत असणे हे देखील एक कौशल्य आहे. मी सध्या याच गोष्टीवर पकड मिळवली आहे. लवकरच मी सर्वोत्तम लयीत खेळताना दिसेन,’’ असे झ्वेरेव म्हणाला.
‘‘अमेरिकन टेनिस स्पर्धा माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरली आहे. येथील परिस्थितीमुळे इथे चांगला खेळ करणे खरोखर कठीण जाते. मात्र, मी यातून मार्ग काढेन,’’ असेही झ्वेरेवने सांगितले. तिसर्या फेरीत त्याची चिलीच्या अलेहांद्रो ताबिलोशी गाठ पडेल.
ॲलेक्स डी मिनौरचा पराभव
ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित ॲलेक्स डी मिनौरला पराभवाचा सामना करावा लागला. दुसर्या फेरीत बोटिक व्हॅन डी झँडशुल्प याने मिनौर याला ६-४, ७-५, ६-२ असे नमवले. महिला एकेरीत एलिना रायबाकिनाने स्पेनच्या जेसिका बौझास मनेरियोचा ६-२, ६-४ असा पराभव केला. अमेरिकेच्या कोको गॉफने स्पेनच्याच पाओला बाडोसावर ६-४, ७-६ (७-५) अशी मात केली.
