वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत मानांकित खेळाडूंनी घौडदौड कायम राखली आहे. अव्वल सहाही खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठत जेतेपदासाठी चुरस निर्माण केली असून त्यातही एलिना रायबाकिनाचा नाओमी ओसाकावरील विजय लक्षवेधी ठरला. पुरुष गटातून अव्वल १० पैकी केवळ तीनच मानांकित खेळाडू आपले आव्हान राखू शकले आहेत.

महिला गटातून अग्रमानांकित अरिना सबालेन्का, दुसरी मानांकित रायबाकिना, तिसरी मानांकित जेसिका पेगुला, चौथी मानांकित कोको गॉफ, पाचवी मानांकित मीरा आंद्रीवा आणि सहावी मानांकित लिंडा नोस्कोव्हा, तर पुरुष गटातून अग्रमानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेव, दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ आणि आठवा मानांकित बेन शेल्टन अजूनही स्पर्धेत आहेत.

रायबाकिनाने चार वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाचा ६-१, ६-४ असा सहज पराभव केला. या विजयामुळे जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान रायबाकिनाच्या दृष्टिक्षेपात आले आहे. मात्र, हे स्थान गाठण्यासाठी तिला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या किनवेन झेंग हिची स्वप्नवत आगेकूच रोखावी लागेल.

उपउपांत्यपूर्व फेरीत झेंगने आठव्या मानांकित इगा श्वीऑटेकला ७-५, ६-३ असा पराभवाचा धक्का दिला. अमेरिकेच्या माजी विजेत्या कोको गॉफने आपलीच देशवासीय चौदाव्या मानांकित इव्हा जोविचचे आव्हान ६-१, ६-४ असे परतवून लावले. मीरा आंद्रिवाने २४व्या मानांकित ॲनास्तासिया पोटापोवाचा ५-७, ६-४, ६-३ असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत गॉफ आणि आंद्रीवा या अनुक्रमे चौथे आणि पाचवे मानांकित मिळालेल्या खेळाडू आमनेसामने येणार आहे.

झ्वेरेवची व्हॅन डी झँडशुल्पशी गाठ

  • नेदरलँड्सच्या बिगरमानांकित बोटिक व्हॅन डी झँडशुल्पने उपांत्यपूर्व फेरी गाठताना आर्थर गियाचे आव्हान तब्बल पाच सेट आणि पाच तास झुंजीत परतवून लावले. आता त्याला अग्रमानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेवला सामोरे जावे लागेल.
  • झँडशुल्पने तब्बल ५ तास १३ मिनिटे रंगलेली लढत ३-६, ६-७
    (०-७), ७-६ (९-७), ७-६ (७-३), ६-४ अशी जिंकली. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या झ्वेरेवने इटलीच्या लुसियानो दारदेरीला ६-२,
    ६-२, ७-६ (७-३) असे सरळ सेटमध्ये नमवले.