वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील सनसनाटी निकालांची मालिका किमान दुसऱ्या फेरीत तरी खंडित झाली. राफेल नदाल, डॅनिल मेदवेदेव, इगा श्वीऑनटेक या प्रमुख खेळाडूंसह माजी विजेत्या अँडी मरे यांनी कमालीचे सातत्य राखून चमकदार विजयासह तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

नदालला सलग दुसऱ्या लढतीत चौथ्या सेटपर्यंत खेळावे लागले. लढतीदरम्यान स्वत:चीच रॅकेट लागून झालेल्या किरकोळ दुखापतीवर मात करत नदालने फॅबिओ फॉग्निनीचे आव्हान २-६, ६-४, ६-२, ६-१ असे परतवून लावले. तिसऱ्या फेरीत त्याची गाठ आता फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटशी पडणार आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित श्वीऑनटेकने माजी विजेत्या स्लोआनी स्टिफन्सचे आव्हान ६-३, ६-२ असे सहज मोडून काढले.

पुरुष एकेरीतील अग्रमानांकित मेदवेदेवने सलग तीन सेटमध्ये विजय मिळवला. मेदवेदेवने फ्रान्सच्या आर्थर रिंडरनेचे आव्हान ६-२, ७-५, ६-३  असे मोडून काढले. मेदवेदेवची गाठ आता चीनच्या वू यिबिंगशी पडणार आहे. त्याने पात्रता फेरीतून आलेल्या पोर्तुगालच्या नुनो बोर्गेसचा ६-७(३-७), ७-६(७-४), ४-६, ६-४, ६-४ असा पराभव केला. या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत प्रवेश करणारा वू पहिला चिनी खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या निक किरियसने फ्रान्सच्या बेंजामिन बोंझीचा ७-६(७-३), ६-४, ४-६, ६-४ असा पराभव केला.

नदालला दुखापत

स्पेनच्या नदालने आणखी एका संघर्षपूर्ण विजयाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. फॉग्निनीविरुद्धच्या दुसऱ्या सेटमधील लढतीत त्याला किरकोळ दुखापत झाली. चौथ्या सेटला ३-० असे आघाडीवर असताना नदालने चेंडू घेण्यासाठी सवयीप्रमाणे रॅकेट चेंडूवर आपटले. मात्र, या वेळी रॅकेट कोर्टवरून उसळून नदालच्या नाकावर आदळली. या आघाताने नदालच्या नाकातून रक्त येऊ लागले. हातातील रॅकेट तशीच फेकून देत नदाल कोर्टवर पडून राहिला. त्यावेळी नदालने उपचारांसाठी वेळही मागून घेतला. अर्थात, दुखापत गंभीर नव्हती. नदालने नंतर आपला झंझावात कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

बोपण्णा, रामनाथनचा पराभव

भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत इटलीच्या आंद्रेआ वावासोरी-लॉरोन्झो सोनेगो जोडीने रोहन बोपण्णा-मॅटवे मिडलकूप जोडीला ६-७ (२-७), २-६ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा-यांद झाओशुआन जोडीने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल-गॅब्रिएला डाब्रोवस्कीने ५-७, ५-७ असे हरवले. रामनाथन-निकोला छाचिचने इटलीच्या सिमोन बोलेली-फॅबिओ फॉग्निनीकडून ४-६, ४-६ असा पराभव पत्करला.