पीटीआय, न्यूयॉर्क : गेल्या दोन दशकांपासून टेनिस कोर्टवर अनेक विक्रम करणाऱ्या सेरेना विल्यम्सने  अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर टेनिस प्रवासाला पूर्णविराम दिला. स्पर्धेपूर्वीच यंदाची अमेरिकन स्पर्धा अखेरची असल्याचे संकेत सेरेनाने दिले होते. त्यानुसार कारकीर्दीत २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविणाऱ्या सेरेनाने टेनिस विश्वाचा भावपूर्ण निरोप घेतला. ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविचविरुद्धचा तिसऱ्या फेरीतला सेरेनाचा सामना हा अखेरचा ठरला. तीन तासांहून अधिक चाललेल्या या सामन्यात अजलाने सेरेनाला ७-५, ६-७ (४-७), ६-१ असे पराभूत केले.वयाच्या ४१व्या वर्षीदेखील सेरेनाचा उत्साह, जिद्द कुठेही कमी झालेली नव्हती. सेरेनाने पाच मॅच पॉइंट वाचवले. पण जेव्हा अखेरचा फटका नेटमध्ये अडकला, त्याच क्षणी सेरेनाच्या डोळय़ांच्या कडा पाणावल्या. कोर्ट सोडताना व्यक्त केलेल्या भावना सेरेनाबाबत खूप काही सांगून गेल्या. सेरेना म्हणाली, ‘‘माझ्यासाठी २५ वर्षांचा हा सगळा प्रवास अविश्वसनीय होता. या प्रवासात प्रत्येक क्षणी माझा उत्साह वाढवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे.’’

वयाच्या १७व्या वर्षी मार्टिना हिंगीससारख्या अव्वल खेळाडूला पराभूत करून टेनिसविश्वाला अचंबित करणारी सेरेना वयाच्या चाळिशीतही तेवढय़ाच जिद्दीने खेळताना दिसली. ती हरेल असे आजही वाटले नव्हते.अनेक वेळा तिने महत्त्वपूर्ण गुण मिळवले. तिची सव्‍‌र्हिस तेवढीच धारदार वाटत होती. तिच्या चाळिशीतल्या खेळाला दाद द्यायला सेरेनाची मुलगी ऑलिम्पिया प्रेक्षकांत उपस्थित होती.

दुखापतींचे आव्हान

कारकीर्दीत सेरेना अभावानेच दुखापतीमुळे टेनिसपासून दूर राहिली. तिला पहिली मोठी दुखापत २०१० मध्ये म्हणजे तिच्या १३व्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदानंतर झाली. तीदेखील कोर्टबाहेर. एका हॉटेलमधून बाहेर पडताना तिचा पाय फुटलेल्या काचेवर पडला. त्या वेळी सेरेनाच्या उजव्या पायावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. सेरेनाला दहा आठवडय़ांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तिच्या फुप्फुसात रक्ताच्या गाठी आढळून आल्या. यामुळे तिच्या कारकीर्दीवर मोठा परिणाम झाला.

मरे पराभूत

इटलीच्या माटेओ बेरेट्टीनीने ब्रिटनच्या मरेचा ६-४, ६-४, ६-७(१-७), ६-३ असा पराभव केला. अग्रमानांकित डॅनिल मेदवेदेवने चीनच्या वू यिबिंगचे आव्हान ६-४, ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले. निक किरियॉसने अमेरिकेच्या जे. जे. वोल्फचा ६-४, ६-२, ६-३ असा पराभव केला. ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने डेन्मार्कच्या होल्जर रुनचा ७-५, ६-४, ६-१ असा पराभव केला. महिला एकेरीत अमेरिकेच्या १८ वर्षीय कोको गॉफने चौथी फेरी गाठताना मेडिसन कीजचा ६-२, ६-३ असा पराभव केला. कोकोची गाठ आता झँघ शुएईशी पडेल. झॉंघने रिबेका मरिनोचा ६-२, ६-४ असा पराभव केला. फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने  कॅनडाच्या बियान्का आंद्रेस्क्यूचा ६-३, ६-२ असा पराभव केला.

गोल्डन स्लॅम

  • १९९५ : वयाच्या १४व्या वर्षी सर्वप्रथम व्यावसायिक स्पर्धेत सहभाग
  • १९९८ : १६व्या वर्षी सर्वप्रथम ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभाग
  • १९९९ : १७व्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद

जुलै २००२ : टेनिस जागतिक क्रमवारीत अग्रस्थान

  • २००२ ते २००३ : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेपासून ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेपर्यंत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद. चारही वेळा मोठी बहीण व्हिनसचा पराभव.
  • २०१२ : चारही ग्रँडस्लॅम विजेतेपदाबरोबर ऑलिम्पिक स्पर्धा जिंकून ‘गोल्डन स्लॅम’. यात बहीण व्हिनसच्या साथीत दुहेरीतही जेतेपद.
  • २०१४-१५ : या कालावधीतही सेरेनाने सलग चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या.

वादग्रस्त सेरेना

२००२ : अमेरिकन स्पर्धेत कॅट सूट घालून कोर्टवर उतरल्याने वाद निर्माण झाला.

२०१८ : अमेरिकन स्पर्धेदरम्यानच सेरेनाने पंचांना ‘चोर’ म्हटले होते.

दुखापती अभावानेच

कारकीर्दीत सेरेना अभावानेच दुखापतीमुळे टेनिसपासून दूर राहिली. तिला पहिली मोठी दुखापत २०१० मध्ये म्हणजे तिच्या १३व्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदानंतर झाली. तीदेखील कोर्टबाहेर. एका हॉटेलमधून बाहेर पडताना तिचा पाय फुटलेल्या काचेवर पडला. त्या वेळी सेरेनाच्या उजव्या पायावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. सेरेनाला दहा आठवडय़ांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तिच्या फुप्फुसात रक्ताच्या गाठी आढळून आल्या. यामुळे तिच्या कारकीर्दीवर मोठा परिणाम झाला.

मी अजूनही खेळू शकते, पण आता निवृत्तीचा निर्णय मागे घेणार नाही. आता मला चांगली आई व्हायचे आहे. माझ्यातील वेगळी सेरेना मला साद घालत आहे. मी अजूनही टेनिसपासून दूर गेलेली नाही. माझ्यापुढे अजूनही टेनिस विश्वातील वेगळय़ा वाटा आहेत.  

– सेरेना विल्यम्स