scorecardresearch

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जेतेपदासाठी युवाद्वंद्व!; नॉर्वेच्या रुडसमोर स्पेनच्या अल्काराझचे आव्हान

स्पेनचा १९ वर्षीय कार्लोस अल्काराझ आणि नॉर्वेचा २३ वर्षीय कॅस्पर रूड या दोन युवा खेळाडूंमध्ये यंदाच्या अमेरिका खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जेतेपदासाठी युवाद्वंद्व!; नॉर्वेच्या रुडसमोर स्पेनच्या अल्काराझचे आव्हान

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : स्पेनचा १९ वर्षीय कार्लोस अल्काराझ आणि नॉर्वेचा २३ वर्षीय कॅस्पर रूड या दोन युवा खेळाडूंमध्ये यंदाच्या अमेरिका खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. अमेरिकन स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारे चारही खेळाडू नवे होते. या स्पर्धेत चौघांनी उपांत्य फेरीपर्यंत प्रथमच मजल मारली होती. या वेळच्या लढतीने केवळ अमेरिकन स्पर्धेला नवा विजेताच नाही, तर टेनिस विश्वाला नवा अव्वल स्थानावरील खेळाडू मिळणार आहे. डॅनिल मेदवेदेवचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे अव्वल स्थान रिक्त आहे. त्या जागेवर अल्काराझ आणि रूड यांना समान संधी आहे. मात्र, त्यासाठी विजेतेपद आवश्यक आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित अल्कराझने २२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोवर ६-७ (६-८), ६-३, ६-१, ६-७ (५-७), ६-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत रुडने २७व्या मानांकित कारेन खाचानोवचे आव्हान ७-६ (७-५), ६-२, ५-७, ६-२ असे चार सेटमध्ये परतवून लावले.

अल्काराझ प्रथमच ग्रॅँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असला, तरी रुड दुसऱ्यांदा जेतेपदाची लढत खेळत आहे. याच वर्षी जूनमध्ये रुडने फ्रेंच खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. स्पेनच्याच राफेल नदालने त्याला पराभूत केले. या वेळीदेखील विजेतेपदाच्या लढतीत रुडचा प्रतिस्पर्धी स्पेनचाच आहे. 

सॅलिस्बरी-राम विजेते

ज्यो सॅलिस्बरी आणि राजीव राम यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकावले. जेतेपदाच्या लढतीत त्यांनी वेस्ली कुलहॉफ-नील स्कुप्सकी जोडीचा ७-६ (७-४), ७-५ असा पराभव केला.

उपांत्य फेरीच्या दोन्ही लढतीत खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी लागली. अल्काराझला अमेरिकेच्या टियाफोचा पराभव करण्यासाठी पाच सेट झुंजावे लागले. पण, दमल्याचे त्याच्या हालचालीतून जाणवत नव्हते. महत्त्वाच्या क्षणी गुणांची वसुली करताना अल्काराझने बाजी मारली. ग्रँडस्लॅमसारख्या मोठय़ा व्यासपीठावरून खेळताना कोर्टवर तुम्हाला सर्वस्व झोकून देऊन खेळावे लागते. टियाफोदेखील तसाच खेळला. अखेरच्या क्षणी एक वेळ माझेच नाडीचे ठोके वाढले होते. पाय थरथरायला लागले होते. पाच सेटनंतर जिंकू शकलो, याचा आनंद निश्चित आहे.

– कार्लोस अल्काराझ

फ्रेंच जेतेपद गमावल्यावर निराश होतो. कारकीर्दीतली अखेरचीच गॅंडस्लॅम स्पर्धेची अंतिम लढत खेळलो अशी भावना निर्माण झाली होती. मात्र, या स्पर्धेतही चांगली कामगिरी झाली. खूप समाधानी आहे. इथपर्यंत खेळताना जेवढे दडपण नव्हते, तेवढे अंतिम लढत खेळताना असेल. अल्काराझही प्रतिभावान युवा खेळाडू आहे.

– कॅस्पर रुड

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या