अमेरिकेला टी२० वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत प्रवेशासाठी प्रतिस्पर्धी संघांची मदत आवश्यक आहे. रविवारी झालेल्या लढतीत अमेरिकेने नामिबियावर विजय मिळवला.

अमेरिकेचे तूर्तास भारत आणि पाकिस्तानएवढे गुण झाले आहेत. मात्र त्यांचा नेट रनरेट कमी आहे. बाद फेरीसाठी त्यांच्यासाठी समीकरण सोपं आहे. भारत-पाकिस्तान लढतीत जो संघ हरले, तो पुन्हा हरेल. मोठ्या फरकाने हरावा जेणेकरून त्यांचा नेट रनरेट आणखी बिघडावा. भारताचा नेट रनरेट तूर्तास उत्तम आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरुद्ध हरावं आणि शेवटच्या लढतीतही तसंच व्हावं.

अ गटात भारत, पाकिस्तान यांच्यासह अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियाचा समावेश आहे. अमेरिकेने नेदरलँड्स आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळवला आहे. बाद फेरीच्या त्यांच्या आशा जिवंत आहेत. दुसरीकडे सलग तीन सामने गमावल्यामुळे नामिबियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अमेरिकेने रविवारी झालेल्या लढतीत दमदार सांघिक प्रदर्शन करत नामिबियावर विजय मिळवला.

अमेरिकेने रविवारी चेन्नईत झालेल्या लढतीत १९९ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार मोनाक पटेलने ३० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. मोनाक आणि शयान जहांगीर यांनी ६८ धावांची सलामी दिली. १८ चेंडूत २२ धावा करून जहांगीर बाद झाला. साईतेजा मुकम्मला १७ धावा करून तंबूत परतला. संजय कृष्णमूर्तीने सूत्रं हाती घेत ३३ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी केली. मिलिंद कुमारने २० चेंडूत २८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. नामिबियातर्फे विल्यम मायबर्ग आणि गेरहार्ड इरॅसमस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

नामिबियाने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोरेन स्टीनकॅम्प आणि जॅन फ्रायलिंक यांनी ५४ धावांची खणखणीत भागीदारी केली. फ्रायलिंक १९ धावांवर बाद झाला. जॅन निकोल लोफ्टी-इटॉनने १७ चेंडूत २८ धावांची खेळी केली. ३९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. स्टीनकॅम्प बाद झाल्यानंतर नामिबियाची लय हरवली. जेजे स्मूट्सने ३१ धावांची खेळी केली. नामिबियाने १६८ धावांची मजल मारली. अमेरिकेतर्फे शॅडले व्हॅन स्कायलॅकने २ तर अली खान, सौरभ नेत्रावळकर आणि शुभम रांजणे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.