अमेरिकेच्या संघाने टी२० वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत जेतेपदाचे प्रबळ दावेदार आणि गतविजेत्या भारतीय संघाला १६१ धावांतच रोखले. एकाक्षणी भारतीय संघाची अवस्था ७७/६ अशी होती. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या झुंजार अर्धशतकी खेळीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्या गाठली. झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय संघाला एवढ्या कमी धावात रोखणं हे अमेरिकेचं यश आहे. जाणून घेऊया अमेरिकेचा संघ कोणाच्या मार्गदर्शनात खेळतो.
श्रीलंकेचे ५४वर्षीय पुबूडू दासानायके अमेरिकेचे मुख्य प्रशिक्षक आहेत. दासानायके यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीतही अमेरिकेच्या संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं. त्यानंतर स्टुअर्ट लॉ यांनी अमेरिकेचे प्रशिक्षकपद सांभाळलं होतं. आता पुन्हा पुबूड यांच्याकडे संघाची सूत्रं आहेत. दासानायके यांनी नेपाळ आणि कॅनडाच्या संघाचं प्रशिक्षकपदही भूषवलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनात कॅनडाने दोन वर्षांपूर्वी झालेल्या टी२० वर्ल्डकपसाठी पात्र होण्याचा मान मिळवला होता.
दासानायके यांनी ११ टेस्ट आणि १६ वनडेत श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. श्रीलंकेसाठी खेळणं थांबवल्यानंतर त्यांनी कॅनडा गाठलं. ते कॅनडा संघासाठीही खेळले. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेच्या U19 संघाला वर्ल्डकपसाठी पात्र होण्यात भारताचे व्हिन्सेंट विजय कुमार यांचा सिंहाचा वाटा होता. व्हिन्सेंट हे आंध्र रणजी संघाकडून खेळायचे. युवा संघाला मार्गदर्शनाचा अनुभव असणाऱ्या व्हिन्सेंट यांच्याकडे वरिष्ठ संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सोपवण्यात आली.
टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने श्रीलंकेच्या धम्मिका प्रसादला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केलं. प्रसाद यांनी २५ टेस्ट, २४ वनडे सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं. नव्या चेंडूसह गोलंदाजी करताना हमखास विकेट पटकावण्याची प्रसाद यांची हातोटी होती. श्रीलंकेने २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. त्यात प्रसाद यांची भूमिका निर्णायक होती. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर प्रसाद यांनी प्रशिक्षणाकडे मोर्चा वळवला. त्यांनी नेपाळ संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केलं. टी२० वर्ल्डकपचे सामने श्रीलंकेत होणार आहे. त्यादृष्टीनेही प्रसाद यांचा अनुभव अमेरिकेच्या संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
ऋषी भारद्वाज अमेरिकेचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. मॅथ्यू स्कायनर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत. संपत शेषाद्री अॅनालिस्ट म्हणून काम पाहतात. जतीन माहेश्वरी अमेरिका संघाचे फिजिओथेरपिस्ट आहेत. ऑस्कर अल्वारेझ यांच्याकडे व्यवस्थापक पदाची धुरा आहे.
