यंदाच्या वर्ल्डकपचे सहआयोजक असलेल्या अमेरिकेच्या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. बेल्जियमच्या संघाने अमेरिकेवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयाला ट्रम्प यांनी केलेल्या राजकीय हस्तक्षेपाची किनार आहे.
ट्रम्प यांनी फिफाच्या अध्यक्षांना तीनवेळा फोन करून अमेरिकेच्या खेळाडूवर असलेली एका सामन्याची बंदी हटवली. फिफाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपाला स्थान नसताना हा प्रकार घडल्याने अमेरिकाची मक्तेदारी सिद्ध झाल्याची टीका चाहत्यांनी केली आहे. रेड कार्ड मिळाल्यानंतर खेळाडूला पुढच्या सामन्यात खेळता येत नाही. यानुसार बालोगनला बेल्जियमविरुद्धच्या लढतीत खेळता येणार नव्हते. ट्रम्प यांनी हस्तक्षेप करून ही बंदी हटवायला लावली. अमेरिकेसमोर फिफा शरण आल्याची टीकाही होते आहे.
अमेरिकेच्या पराभवासह वर्ल्डकपचे तिन्ही आयोजक संघांनी (कॅनडा, मेक्सिको) गाशा गुंडाळला आहे. बेल्जियमने खणखणीत खेळाच्या बळावर अमेरिकेचा धुव्वा उडवला. चार्ल्स डी केटालारेने दोन गोल करत बेल्जियमच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. हान्स वानाकेनने एक गोल केला. रोमेलू लुकाकूने अतिरिक्त वेळेत गोल करत बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बेल्जियमच्या खेळाडूंनी बहुतांश वेळ चेंडूवर नियंत्रण राखत अमेरिकेच्या खेळाडूंना गोल करण्याची संधीच दिली नाही.
ट्रम्प हस्तक्षेपाचं प्रकरण काय होतं?
अमेरिकेचा खेळाडू फोलारिन बालोगनला बोस्निया हर्झेगोविनाविरुद्धच्या लढतीत रेड कार्ड दाखवण्यात आलं. रेड कार्ड नियमानुसार, त्याच्यावर एका सामन्यापुरती बंदी आली. यामुळे सोमवारी होणाऱ्या अमेरिकेच्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीत तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. हा प्रकार लक्षात येताच वर्ल्डकपच्या यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट फिफाचे प्रमुख जिआनी इन्फॅन्टिनो यांना कॉल केला. ट्रम्प आणि इन्फॅन्टिनो म्हणजेच पर्यायाने व्हाईट हाऊस आणि फिफा यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही तासात बालोगन याच्यावरील एका सामन्याची बंदी हटवण्यात आली आहे. रेड कार्डानंतर एका सामन्याची बंदी हा नियम आहे. मात्र जागतिक महासत्तेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी थेट फिफालाच नियम वाकवायला लावला आहे.
इतिहास काय सांगतो?
वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत १८९ रेड कार्ड दाखवण्यात आली आहेत. याआधी फक्त एकदा रेड कार्ड दाखवण्यात आलेल्या खेळाडूला पुढच्या सामन्यात खेळता आलं होतं. १९६२ मध्ये चिलीविरुद्ध ब्राझीलच्या गरिन्चाला रेड कार्ड दाखवण्यात आलं. मात्र त्यानंतरही चेक रिपब्लिकविरुद्धच्या फायनलच्या मुकाबल्यात गरिन्चा खेळला होता. मात्र तेव्हाच्या फिफाच्या नियमानुसार रेड कार्डचा अर्थ एका सामन्यापुरतं निलंबन असा नव्हता. तांत्रिक समिती आणि सामन्याशी निगडीत तंत्रज्ञ यांनी मिळून रेड कार्डचा निर्णय घेतला होता.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ११ खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आलं आहे. त्यापैकी प्रत्येकाला पुढच्या सामन्यात खेळता आलेलं नाही. मग अमेरिकेच्या बालोगनला नियमात सूट का? असा सवाल केला जात आहे.
बंदी हटवल्यामुळे फिफाचे प्रमुख इन्फॅन्टिनो यांना पद सोडावं लागू शकतं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय दबावाला बळी पडून असा निर्णय घेतल्यामुळे फिफाची प्रतिमा मलिन झाली आहे अशी फुटबॉल वर्तुळात चर्चा आहे.
