T20 World Cup 2026 USA Squad: टी-२० विश्वचषक २०२६ अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेविरूद्ध होणार आहे. अमेरिका संघाने टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन मराठमोळे खेळाडू खेळणार आहेत. तर निम्मा संघ तर भारतीय वंशातील खेळाडूंचा आहे.
अमेरिकेच्या या संघात भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत, जे एकत्र खेळताना दिसणार आहे. तर २ मराठमोळे खेळाडूदेखील संघात आहेत, तर रोहित शर्माचा मित्रदेखील या संघाचा भाग आहे. तर संघाचे नेतृत्त्वही भारतीय वंशाचा खेळाडू करणार आहे.
अमेरिकेने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची ही अमेरिकेची दुसरी वेळ असेल. २०२४ मधील गेल्या टी-२० विश्वचषकात, संघाने पदार्पणाच्या हंगामात सुपर ८ टप्प्यात पोहोचून इतिहास घडवला होता. या संघात मागील स्पर्धेत खेळलेले १० खेळाडू आहेत. दरम्यान, यावेळी काही नवीन चेहऱ्यांनाही संघात स्थान मिळालं आहे. संघाचे नेतृत्व मोनांक पटेल करणार आहे, जो बराच काळ संघाचे नेतृत्व करत आहे.
अमेरिकेच्या संघात बहुतेक भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. पाकिस्तानी वंशाचे दोन खेळाडू देखील संघात निवडले गेले आहेत. अली खान आणि मोहम्मद मोहसीन अशी या दोन खेळाडूंची नावं आहेत. त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला पण ते अमेरिकन संघाकडून खेळतात. अली खान हा संघाचा बराच काळ सदस्य आहे, तर मोहम्मद मोहसिनला पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आलं आहे. श्रीलंकेत जन्मलेल्या शेहान जयसूर्याचीही निवड करण्यात आली आहे.
याशिवाय संघात सौरभ नेत्रावळकर व शुभम रांजणे या दोन मराठमोळ्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. २०२४ मधील टी-२० विश्वचषकात सौरभ नेत्रावळकरने आपल्या वेगवान गोलंदाजीने खळबळ उडवली होती. तर हरमीत सिंग हा मुंबईचा असून तो रोहित शर्माचा शाळेतील मित्र आहे, ते दोघं एकाच शाळेत शिकले आहेत.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील अमेरिकेचं वेळापत्रक
७ फेब्रुवारी – अमेरिका वि. भारत, मुंबई<br>१० फेब्रुवारी – अमेरिका वि. पाकिस्तान, कोलंबो
१३ फेब्रुवारी – अमेरिका वि. नेदरलँड्स, चेन्नई
१५ फेब्रुवारी – अमेरिका वि. नामिबिया, चेन्नई
टी-२० विश्वचषक २०२६ साठी अमेरिकेचा संघ
मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रिज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शान जहांगीर, सईतीजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्तुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावळकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रांजणे

