टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत पाकिस्तानने मालिका जिंकली आहे. पण या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार का नाही याबाबत अनिश्चितता आहे. पण यादरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजावर चिटिंग करण्याचा आरोप केला आहे.

टी-२० विश्वचषकासाठी निवड झालेला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनमुळे वादात सापडला आहे आणि यावेळी सामन्यादरम्यान त्याच्यावर चिटिंगचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान, उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.

ऑस्ट्रेलियाच्या डावात कॅमेरून ग्रीन फलंदाजी करत होता आणि वेगाने धावा काढत होता. त्यानंतर ११ व्या षटकात फिरकी गोलंदाज तारिक गोलंदाजी करायला आला आणि त्याने चौथ्या चेंडूवर ग्रीनला बाद केलं. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियन फलंदाजाने आपली विकेट गमावली, त्यानंतर गोंधळ सुरू झाला. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या कॅमेरून ग्रीनने सीमारेषा ओलांडताना दगडफेक करण्याची नक्कल करून आपला राग व्यक्त केला.

पण प्रत्यक्षात, ग्रीनच्या नक्कलमुळे फिरकी गोलंदाज उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, जो अनेकदा वादात सापडला आहे. ग्रीनच्या या कृतीमुळे वाद निर्माण झाला आणि सोशल मीडियावर तारिकच्या गोलंदाजीवरून चिटिंग केली जात असल्याचा आरोप केला.

कशी आहे तारिकची गोलंदाजी अॅक्शन?

खरं तर, उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक गोलंदाज तारिक याची गोलंदाजी अॅक्शन इतरांप्रमाणे साधारण नाहीये. तो चेंडू टाकण्यापूर्वी थांबतो आणि नंतर खांद्यावरून चेंडू न टाकता बाजूने हात आत आणून चेंडू टाकतो. हे जणू कोणीतरी दगड फेकल्यासारखे भासतं. पण अशी गोलंदाजी करणारा तो पहिला खेळाडू नाहीये; लसिथ मलिंगा ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा त्यासारखाच आहे. केदार जाधव आणि रियान पराग यांनीही भारतासाठी अशीच गोलंदाजी केली आहे. शिवाय, तारिकची गोलंदाजीची कृती आयसीसीने दोनदा तपासली आहे आणि ती क्लिअर असल्याचे आढळून आले आहे.

उस्मान तारिकलादेखील ग्रीनने केलेली कृती दिसली आणि त्यानंतर त्याने तारिकची खिल्ली उडवली. सामन्यानंतर तारिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रडणाऱ्या मुलाची स्टोरी शेअर केली.