Usman Tariq Celebration After Suryakumar Yadav Wicket: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला हाय व्हॉल्टेज सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इशानचं शतक थोडक्यात हुकलं. शेवटी सूर्यकुमार यादवने महत्वपू्र्ण धावा जोडल्या. दरम्यान सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर गोलंदाजी करत असलेल्या उस्मान तारिकने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, इशान किशनने चांगली सुरूवात करून दिल्यानंतर शेवट गोड करण्याची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादववर होती. सूर्यकुमार यादवने ३ चौकारांच्या साहाय्याने २९ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. पाकिस्तानची गोलंदाजी सुरू असताना १९ वे षटक टाकण्यासाठी उस्मान तारिक गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत उंच गेला, पण हवा तितका लांब गेला नाही. त्यामुळे तो सईम अयुबच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. सूर्यकुमार यादवला ३२ धावांवर बाद केल्यानंतर उस्मान तारिकने आपला उजवा हात ओठांजवळ नेऊन शांत राहण्याचा इशारा केला आहे. या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
भारतीय संघाने केल्या १७५ धावा
या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १७५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानावर आली.अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शून्यावर माघारी परतला. पण त्यानंतर इशान किशनने भारतीय संघाचा डाव सांभाळला. इशान किशनने अवघ्या २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने ७७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २५ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने ११ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारती संघाने ७ गडी बाद १७५ धावा केल्या.
इशान किशनची विक्रमी अर्धशतकी खेळी
भारत- पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज
मोहम्मद हफीज-२३ चेंडूत, अहमदाबाद, २०१२
अभिषेक शर्मा- २४ चेंडूत, दुबई, २०२५
इशान किशन- २७ चेंडूत, कोलंबो, २०२६*
युवराज सिंग- २९ चेंडूत, अहमदाबाद, २०१२

