रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील चार सामन्यांमध्ये आठ संघ आपापसात भिडले होते. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बेंगळुरूमध्ये खेळवले गेले. या चार पैकी तीन समन्यांचा निकाल चौथ्या दिवशीच हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि मुंबईच्या रणजी संघांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. तर, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील सामना अद्याप सुरू आहे.

उत्तर प्रदेश विरुद्ध कर्नाटक – रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यांच्यादरम्यान झाला. पहिल्या डावात पराभव पिछाडीवर असूनही कर्णधार करण शर्माच्या नाबाद ९३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात कर्नाटकचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. रणजी करंकडकामध्ये उत्तर प्रदेशने कर्नाटकचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही त्यांना कर्नाटकला हरवता आले नव्हते.

मध्य प्रदेश विरुद्ध पंजाब – मध्य प्रदेश हा रणजी करंडक २०२२ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पोहचणारा दुसरा संघ ठरला आहे. उपांत्यपूर्व फेरीत पंजाब संघाचा १० गडी राखून पराभव करून मध्य प्रदेशने ही कामगिरी केली आहे. गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच मध्य प्रदेशचा संघ उपांत्य सामना खेळताना दिसणार आहे. आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर हे दोन्ही मोक्याचे खेळाडू उपस्थित नसतानाही मध्य प्रदेशच्या संघाने ही कामगिरी करून दाखवली आहे.

मुंबई विरुद्ध उत्तराखंड – रणजी करंडकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईच्या संघाने उत्तराखंडचा ७२५ धावांच्या विशाल फरकाने पराभव केला. या सामन्यात मुंबईने उत्तराखंडला एकूण ७९५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात उत्तराखंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात ६९ धावांमध्येच गारद झाला. धावांच्या बाबतीत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तब्बल ९३ वर्षांनंतर मुंबईने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी १९२९ ते ३० या हंगामामध्ये न्यू साउथ वेल्स संघाने क्विन्सलँडवर ६८५ धावांनी विजय मिळवला होता. द्विशतवीर सुवेद पारकर आणि शतकवीर सर्फराज खान हे मुंबईच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.

झारखंड विरुद्ध पश्चिम बंगाल – उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन संघांदरम्यान सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बंगालच्या संघाकडे ४९२ धावांची आघाडी होती.