वूमन्स प्रीमिअर लीगचा चौथा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या हंगामातले सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि बडोद्यातल्या कोटांबी स्टेडियम इथे होणार आहेत. वूमन्स वर्ल्डकपदरम्यान डीवाय पाटील स्टेडियमं नाव सर्वदूर झालं.
बडोद्याला क्रिकेटचा मोठा वारसा आहे. दिग्गज विजय हजारे, दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांच्यापासून किरण मोरे, अंशुमन गायकवाड ते इरफान-युसुफ पठाणे ते पंड्या बंधू- अशी बडोद्याला मोठी परंपरा लाभली आहे. बडोदा क्रिकेट संघटनेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले सयाजीराव गायकवाड यांनीच शहराची क्रिकेटला ओळख करून दिली.
मोतीबाग मैदान हे शहराचं प्रमुख क्रीडा केंद्र झालं. स्पर्धा कोणतीही असो चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद ही मोतीबाग स्टेडियमची ओळख होती. प्रचंड उन्हाळा असो किंवा कडाक्याची थंडी, मोतीबाग मैदानात चाहत्यांची रीघ लागत असे. मोतीबाग स्टेडियमची ही परंपरा आता कोटंबी स्टेडियमपर्यंत पोहोचली आहे. तब्बल २३० कोटी रुपये खर्चून हे स्टेडियम उभारण्यात आल्याची माहिती बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पाच खेळपट्ट्या असून सामनाधिकारी, पंच त्यांना योग्य वाटेल त्यानुसार निर्णय घेतात. स्टेडियमच्या प्रांगणात १७ आऊटडोअर खेळपट्ट्याही आहेत. पाऊस आल्यास वेगवान पद्धतीने पाणी वाहून जाईल अशी ड्रेनेज व्यवस्था तयार करण्यात आली आहे. क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर चाहत्यांसाठी गाइडेड टूर आयोजित केल्या जातात. त्याधर्तीवर टूर आयोजित करण्याचा असोसिएशनचा मानस आहे.
भारत न्यूझीलंड मालिकेच्या निमित्ताने कोटंबी स्टेडियमवर पुरुष संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. भारतीय महिला संघाने इथे काही सामने खेळले आहेत. योगायोग म्हणजे वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने याच मैदानावर होणार आहेत. आयपीएल स्पर्धेतल्या गुजरात जायंट्स संघाचे सराव सामने या मैदानावर होतात. याव्यतिरिक्त बडोदा संघाचे सामने इथे नियमितपणे होतात. आता हे मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर येत आहे.
हारोड-हाळोल-बडोदा हायवेनजीक कोटंबी स्टेडियम वसलं आहे. ३५,००० क्षमतेच्या या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन डिसेंबर २०२४ मध्ये भारत-वेस्ट इंडिज महिलांच्या लढतीने झालं. खांबांचा अडथळा न येता चाहत्यांना सामन्याचा आनंद लुटता येतो. वूमन्स प्रीमिअर लीगच्या सामन्यांवेळी प्रेक्षकांनी या मैदानाला भरभरून पसंती दिली. सुरक्षेचा मु्द्दा महिला चाहत्यांच्या दृष्टीने कळीचा ठरतो. कोटंबी स्टेडियमवर महिला चाहत्यांचं वाढतं प्रमाण त्यांना या ठिकाणी सुरक्षेची चिंता वाटत नसल्याचं द्योतक आहे.
नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमच्या बरोबरीने बडोद्यातलं हे मैदान महिला क्रिकेटचं माहेरघर होऊ पाहत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन करणारं गुजरात राज्यातलं दहावं स्टेडियम आहे.
गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन करणारी स्टेडियम
अहमदाबाद-नरेंद्र मोदी स्टेडियम
अहमदाबाद- सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
बडोदा-रिलायन्स स्टेडियम
बडोदा- मोतीबाग स्टेडियम
राजकोट- माधवराव शिंदे ग्राऊंड
वापी-बिलाखिया स्टेडियम
सुरत- पीठवाला स्टेडियम
राजकोट- निरंजन शहा स्टेडियम
सुरत- लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम
बडोदा- कोटंबी स्टेडियम
